व्यापाऱ्यांनो, टॅक्स भराल तरच आया-बहिणींची अब्रू वाचेल!

रेल्वेमंत्री पियूष गोयल पुन्हा मंत्री बनणार

सामना प्रतिनिधी, मुंबई

मोठय़ा व्यापाऱ्यांनी टॅक्स पेड मनीवरही पुन्हा टॅक्स भरावा लागतोय म्हणून मागे हटू नये, कारण याच पैशातून गरीब घरांना गॅस जोडण्या, वीजपुरवठा आणि प्रसाधनगृहे पुरविली जात आहेत आणि तळागाळातील आपल्याच आया-बहिणींची अब्रू राखली जात आहे, असे भावनिक आवाहन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ‘चाय पे चर्चा’ नावाने सी.पी.टँक येथील माधवबागेत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केले.

ते पुढे म्हणाले की, जीएसटीवरून छोटय़ा व्यापाऱ्यांच्या तक्रारींची योग्य दखल घेऊनच धोरण तयार केले होते. त्यासंबंधात आणखी काही तक्रारी असतील तर त्या ऐकण्यासाठी आम्ही तयार आहोत. याप्रसंगी शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील उमेदवार अरविंद सावंत, अतुल शहा, शरद कोटियन आणि मंगलप्रभात लोढा तसेच व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अंतरिम बजेटमध्ये टॅक्सवर टॅक्स लावला जात असल्याचा विषय आपला लावून धरला होता. यापुढेही आपण जैन बांधवांचे प्रश्न मांडू. देशाला मजबूत सरकार हवे आहे. मजबूर नको. 29 एप्रिलला सुट्टी न घेता मतदानाचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन यावेळी शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी केले.

…तर लोक माझ्या घरावर दगड मारतील
मुंबई सेंट्रल ते राजस्थान थेट गाडी सुरू करण्याची मागणी तत्पूर्वी व्यापाऱयांनी केली होती. त्याचा संदर्भ पकडत रेल्वेमंत्री गोयल यांनी मुंबईचे रेल्वे ट्रफिक एवढे व्यस्त आहे की एकाही नव्या एक्प्रेसला जागा नाही. एखादी नवीन गाडी सुरू करणे म्हणजे चार लोकल रद्द करण्यासारख्या असून लोक माझ्या घरावरच दगड मारतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.