15 ऑगस्टपर्यंत आघाडीतील जागावाटप

18

सामना प्रतिनिधी, मुंबई

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील जागावाटप येत्या 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल व त्या दिवसापासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आम्ही प्रारंभ करणार आहोत, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी दिली.

वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी आघाडीची आज सायंकाळी बैठक झाली. त्यात ज्याची ज्या मतदारसंघात अधिक ताकद ती जागा त्या पक्षाला द्यायचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीला विधानसभेसाठी आमच्यासोबत येण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यांचे आम्हाला उत्तरही आलेले आहे. आम्ही सकारात्मक आहोत. ऍड. प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर येतील अशी आम्हाला आशा आहे. शेकाप, भाकप, माकप, समाजवादी असे छोटे पक्षही आमच्या महाआघाडीत असतील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

दुष्काळासाठी विशेष अधिवेशन बोलवा
पावसाने दडी मारल्याने राज्यातील खरप हंगाम धोक्यात आला आहे. दुबार पेरणीची परिस्थिती असून शेतकऱ्यांच्या हातात दमडी नाही. कर्जमुक्तीपासून 30 लाख शेतकरी अजून कंचित आहेत. विदर्भात सरासरी 30 टक्केही पाऊस झालेला नाही. मराठवाडय़ातील धरणांमध्ये उणे 23 टक्के पाणी शिल्लक आहे. विदर्भातील धरणामध्ये फक्त सहा टक्के पाणी शिल्लक असल्याचेही ते म्हणाले. सरकारने विधिमंडळाचे तातडीने विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळी उपाययोजनांवर चर्चा करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या