माहीम प्रसूतीगृहाची जागा ट्रेनिंग सेंटरसाठी हडपण्याच्या पुन्हा हालचाली

31

सामना ऑनलाईन | मुबई

माटुंगा येथील माहीम महानगरपालिका प्रसुतीगृहातील तळमजल्यावरील रिफुजी जागा ‘स्किल्ड लॅब’ (अद्ययावत ट्रेनिंग सेंटर) बांधण्यासाठी हडपण्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा डाव शिवसेना नगरसेवक आरोग्य समितीचे उपसभापती समाधान सरवणकर यांनी शिवसेना स्टाइलने हाणून पाडला होता. मात्र या घटनेला वर्ष पूर्ण होताच नव्याने सुतिकागृहाचा तळमजला हडपण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या असून सुतिकागृहातील लॅबोरेटरी, वातानूकुलिन यंत्रणा काढून घेण्यासाठी जी – उत्तर विभागाच्या कामगारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, पण शिवसेनेच्या जागरूक कार्यकर्त्यांकडून हल्लाबोल होण्याची शक्यता असल्यामुळे पालिका कर्मचारी आणि विभाग वैद्यकीय अधिकारी माहीम महानगरपालिका सुतिकागृहात फिरकण्यास टाळत असल्याचे उघडकीस आले आहे.

प्रसुतीगृहात महिन्याला दीड हजार महिला रुग्ण, बालके पालिकेची सेवा घेतात. महिन्याला ५० कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया, ७० खाटा असणाऱ्या या प्रसुतीगृहात ७५ प्रसुती होतात. नवीन गर्भार माता नोंदणी, प्रसुतिपूर्व, प्रसुतिपश्चात सेवा, बालरुग्ण, बाह्यरुग्ण सेवा बालकांचे लसीकरण या सेवांसाठी गर्दी असते. रुग्णाचे नातेवाईक प्रसुतिगृहाच्या तळमजल्यावर विसावतात आणि ही जागा ‘स्किल्ड लॅब’साठी हडप केल्यास रुग्णाचे नातेवाईक थांबणार कुठे? त्यातच माहीम, धारावी हा अतिसंवेदनशील विभाग असून या सुतिकागृहाचा लाभ घेणाऱ्यांत मुस्लिम रुग्ण मोठय़ा प्रमाणावर असतात. काही वेळा आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णांचे नातेवाईक थांबणार कुठे, अशातच डॉक्टरांवर हल्ले झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? अशा एक ना अनेक प्रश्नांच्या सरबत्तीने आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या समर्थकांची भंबेरी उडाली होती. शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगरातील रुग्णालयातील अनेक जागा ओस पडल्या असताना व्यवस्थित सुरू असलेल्या माहीम प्रसुतिगृहावर आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा डोळा का, असा सवाल विचारला जात आहे.

>   मला हे प्रकरण पूर्ण माहीत असून मी सुतिकागृहात जाऊन प्रत्यक्ष पहाणीही केली होती. आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. माहीम सुतिकागृहच का हवे याचा आरोग्य अधिकारी अट्टहास का करत आहेत याचा जाब मी २१ तारीखला आरोग्य समितीच्या सभेत विचारणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत सुतिकागृहाची जागा स्किल्ड लॅबसाठी हडपण्यास देणार नाही. यासाठी पालिका आयुक्तांकडेही चौकशी करण्याची मागणी करेन.
समाधान सरवणकर, उपसभापती, आरोग्य समिती, मुंबई महानगरपालिका

आपली प्रतिक्रिया द्या