मुंबई-शिर्डी ४० मिनिटांत, विमानतळाची चाचणी यशस्वी

सामना प्रतिनिधी । शिर्डी

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी आता विमानाने जाणे शक्य होणार आहे. मंगळवारी शिर्डी विमानतळावर घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे. चाचणीसाठी मुंबईहून उड्डाण घेतलेल्या विमानाचे शिर्डी विमानतळावर यशस्वी लँडिंग झाले आहे. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारस मुंबईमधून शिर्डीसाठी विमानाने उड्डाण घेतले आणि अवघ्या ४० मिनिटांच्या कालावधीत विमान शिर्डीत दाखल झाले. विमानामध्ये नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे आणि तज्ज्ञांचे विशेष पथक होते.

विमानतळाच्या धावपट्टीची पाहणी केल्यानंतर १ ऑक्टोबर २०१७पासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण होईल. साईबाबा समाधी महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद शिर्डीला येणार आहेत. शिर्डीहून मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि भोपाळ या शहरांसाठी रोज सहा विमानांच्या उड्डाणाला परवानगी मिळाली आहे. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादावर विमानसेवेचे भविष्य अवलंबून असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या