
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे या मुंबई शहरावर प्रचंड प्रेम होते. मुंबईची सत्ता भाजपच्या हातात देणे हे बाळासाहेब ठाकरे यांना पटले नसते. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे काम होत आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जात आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला.
जयंत पाटील यांनी 293च्या चर्चेवर बोलताना शिंदे-फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली. महाराष्ट्र शासनाचे नगरविकास खाते हे शासनाच्या कारभारातील अत्यंत महत्त्वाचे खाते आहे. मुख्यमंत्री शिंदे स्वतŠ गेल्या 7-8 वर्षांपासून या खात्याचा कार्यभार हाकत आहेत. शिंदे आणि त्यांचे सहकारी लाख म्हणोत की, महाविकास आघाडी सरकार असताना आमच्यावर अन्याय झाला. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच शिंदे यांनी या खात्याच्या माध्यमातून अनेकांचे ’कल्याण’ केले असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला. राज्यात सत्तांतर झाले आणि मुंबई खुल्या तिजोरीसारखी आपल्याला मिळाली अशी भावना सत्ताधाऱयांच्या मनात जागृत झाली आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.
… त्याचवेळी महाविकास आघाडीच्या जन्माची चाहूल
मागील मुंबई पालिकेच्या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद या सर्व गोष्टींचा वापर करून शिवसेनेला चितपट करण्याचा डाव त्यांच्या मित्रांनी आखला होता असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. त्याचवेळी मविआच्या जन्माची चाहूल लागली, असेही ते म्हणाले.