आळंदी पालिकेचा आषाढी यात्रेसाठीचा कृती आराखडा तयार- नगराध्यक्षा उमरगेकर

सामना ऑनलाईन ,आळंदी

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा कालावधीत नागरिक व भाविकांना प्रभावी सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी आळंदी नगरपरिषदेने आषाढीयात्रेसाठी कृती आराखडा तयार केला आहे. आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आणि मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी ही माहिती दिली आहे. वारकऱ्यांना योग्य त्या सुविधा मिळाव्यात आणि त्यांची गैरसोय टाळली जावी यासाठी दक्षता कृती आराखडा आणि माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

कृती आराखड्यामध्ये आळंदी नगरपरिषदेच्या विभाग प्रमुखांच्या कामाचे स्वरूप,परिषदेचा विभाग अंतर्गत कामे व माहिती,निविदा प्रक्रिया,ठराव,कार्यवाही,केलेले कामकाज, अपेक्षित कामकाज,सेवा सुविधा अथवा प्रशासकीय काम ,कामाचे आदेश,कार्यवाही,काम पूर्ण झाल्याचे दिनांक,कामासाठीच समन्व्यक,विभाग प्रमुख नाव,दूरध्वनी क्रमांक,कामाचा विस्तृत तपशील तसेच देण्यात आलेल्या कामातील विशेष नोंदी यांचा या कृती आराखड्यात समावेश आहे.  या आराखड्यात नगरपरिषदेच्या विविध विभाग प्रमुखांचे नाव,विभाग निहाय विभाग प्रमुखांचे कामकाज विवरण, संपर्क क्रमांक देखील देण्यात आले आहेत.

आषाढी यात्रा कृती आराखड्यातील विशेष बाबी

  • नगरपरिषद विद्युत विभागामार्फत पोलिसांसाठी वॉच टॉवर्स उभारणे
  • आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारणे
  • आरोग्य पथक तैनात करणे
  • सार्वजनिक हातपंप दुरुस्तीस प्राधान्य
  • शहरातील रस्त्यावर मुरुम टाकणे

आळंदीच होणारी वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता आळंदी अग्निशमन विभागाच्या मदतीला पुणे आणि पिंपरी महापालिकेची अग्निशमन दलाची वाहनेही तैनात करण्यात येणार आहे. विविध यंत्रणांमधील समन्वय चांगला रहावा यासाठी आळंदी नगरपरिषद कार्यालयात २४ तास कार्यरत असणारं कंट्रोल रुम उभारण्यात आलं आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वॉकी टॉकी देण्यात आले असून वॉकीटॉकीद्वारे संपर्क यंत्रणा राबवण्यात येणार आहे.