दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पाचे पाणी गुजरातला पळवण्याचे षड्यंत्र

18

सामना प्रतिनिधी । नागपूर

दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पातून महाराष्ट्राच्या हक्काचे १५ टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. मात्र जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी हा आरोप फेटाळून लावताना महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला दिले जाणार नाही, अशी ग्वाही दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत भाजपच्या अतुल भातखळकर व अन्य सदस्यांनी दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदी जोड प्रकल्पाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश पाटील यांनी दमणगंगा प्रकल्पातील १५ टीएमसी पाणी गुजरातला दिले जाणार असल्याचा आरोप केला. तेव्हा दमणगंगेतील काही पाणी उचलून अन्य भागात घेऊन जाणे शक्य नसल्याने काही पाणी गुजरातला दिले जाणार असले तरी तेवढेच पाणी तापी खोऱ्यातून महाराष्ट्राला मिळणार असल्याचे निदर्शनास आणले. मुंबई शहराची वाढती गरज लक्षात घेऊन २० टीएमसी पाणी मुंबईला दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक थेंबही अतिरिक्त पाणी गुजरातला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. परंतु यामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही.

गोदावरी खोरे तुटीचे खोरे असल्याने तेथील पाणी मराठवाड्य़ाकडे वळवणे शक्य असल्याचा दावा करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुजरातला पाणी देऊ नये अशी मागणी केली, तर अजित पवार यांनी गुजरातच्या दबावामुळे राज्याचे पाणी देऊ नका अशी मागणी केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही राज्यांतील प्रकल्पांचा ९० टक्के खर्च केंद्र सरकार उचलणार असून या विषयाचे राजकारण न करण्याचे आवाहन केले.

विरोधी पक्ष सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्य़ा जागेत येऊन ‘पाणी चोर, पाणी चोर, भाजपवाले पाणी चोर’, ‘महाराष्ट्राचे पाणी पळवणाऱया सरकारचा धिक्कार असो’ अशी घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या वाट्य़ाचे एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही या आश्वासनाचा पुनरुच्चार करताना सामंजस्य करार करण्यापूर्वी सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेऊन राज्याची भूमिका निश्चित करण्यात येईल अशी ग्वाही दिली व या गदारोळावर पडदा पडला.

आपली प्रतिक्रिया द्या