रानसई धरणाचे प्लास्टर गळू लागले; नागरीकांच्या पोटात भितीचा गोळा

46

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

उरण तालुक्यातील प्रकल्पांना, जनतेला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या संरक्षण भिंतीचा प्लास्टर ढासळू लागल्याने परिसरातील नागरीकांच्या पोटात भितीचा गोळा आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या धरणाची पाहणी करावी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची, संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरीक करीत आहेत.

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून रानसई येथे हे धरण बांधले. यासाठी विधणे, दिघोडे आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. रानसई या आदिवासीवाडी जवळील डोंगर कपारीत 1970 या काळावधीत 770 फूट लांबीची (236.76 मीटर ) व 46 फूट खोली (14 मीटर ) असणारी तसेच 15 स्वयंचलीत दरवाजे असलेला सिमेंट, दगडांचा बंधारा बांधला आहे. 350 एकर क्षेत्रात हे धरण आहे. या धरणात 10 एम.सी.एम. एवढे पाणी साठवले जाते. नुकतेच हे धरण ओव्हरफ्लो झाले. मात्र हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे धरणातून पडणाऱ्या धारांमुळे धरणाला केलेले प्लास्टर ढासळू लागले आहे. त्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे.

धरणाचे प्लास्टरचे काम निकृष्ट पद्धतीचे असल्यामुळेच हे प्लास्टर ढासळू लागले आहे. प्लास्टर ढासळल्याने धरणाच्या भिंतीच्या सळ्या, लोखंड बाहेर आले आहे. पावसाळ्यात या धरण परिसरात अनेक पर्यटक येत असतात. धरणातून पडणाऱ्या उंच पाण्याच्या धारा अंगावर घेण्यासाठी येथे पर्यटकांची झुंबड असते. आत्ता मात्र धरणाच्या पाण्यांच्या धारांसोबत प्लास्टरचे मोठाले तुकडे पडत असल्याने पर्यटकांच्या जीवाला देखिल धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करावी व या धरणाची लवकरात लवकर दुरूस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नाहीतर कोकणातील तिवरे धरणाची पुनरावृत्ती होणास आणि हजारो गावकऱ्यांचे जिवीत व वित्तहानी होण्यास वेळ लागणार नाही अशी भिती धरण परिसरातील गावकरी, पर्यटक व्यक्त करीत आहेत.

यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पनवेल-उरणचे वरिष्ठ अभियंता सतीश पवार याना विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की रानसई धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संरक्षण बंधाऱ्याचा प्लास्टर पावसामुळे ढासळला आहे. तो पुन्हा एकदा दुरूस्त करण्यात येणार आहे. मात्र यामुळे सध्यातरी धरणाला धोका नाही असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या