षटकार ठोका, चौकार हाणा कोंबडय़ा, बोकडांवर ताव मारा!

सामना ऑनलाईन। वसई

हिंदुस्थान हा क्रिकेट शौकिनांचा देश आहे. क्रिकेटच्या स्पर्धांसाठी इथे काय फंडे लढवले जातील याचा काहीही नेम नाही. आमच्या इथे या क्रिकेट खेळा, कोंबडय़ा अन् बोकड मिळवा असे कुणी तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटायला नको. वसईच्या ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमी तरुणांनी ही नामी शक्कल लढवली आहे. वसई-विरारमधील गावांमध्ये सध्या रात्रीचे प्रकाशझोतातील क्रिकेट सामने भरवले जात आहेत. या सर्व सामन्यांसाठी अशी मांसाहारी बक्षिसे लावण्यात येत आहेत.

तालुक्यातील आगाशी, बोळींज, नानभाट, नाळा, उमेळमान या गावांमध्ये आठवडय़ाच्या शेवटी शनिवार, रविवार या स्पर्धांचे आयोजन केले जाते. हे सामने प्रकाशझोतात खेळवले जातात म्हणून जनरेटरची व्यवस्थाही करण्यात येते. लाईव्ह कॉमेंट्री व डी.जे. लावून या आनंदात भर टाकण्यात येते. पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत हे सामने खेळवले जातात. आजुबाजूच्या गावांतील ३५ ते ४० संघ यात सहभागी होतात. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० ते ७०० रुपये प्रवेश फी आकारली जाते. या सामन्यांत आगळ्यावेगळ्या ‘बकरा चषक’ क्रिकेट स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते.

स्पर्धेसाठी पारंपरिक रोख रकमेची बक्षिसे न ठेवता बकरे, कोंबडय़ा आणि अंडी अशी बक्षिसे ठेवण्यात येत आहेत. काही ठिकाणी ही स्पर्धा जिंकणाऱया संघास २५  किलोंचा बकरा आणि चषक देण्यात येतो. दुसऱया क्रमांकाच्या संघास पाच गावठी कोंबडे तर तिसऱया क्रमांकाच्या संघास दोन डझन गावठी कोंबडीची अंडी बक्षीस देण्यात येतात. सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकाविणाऱयास देखील अंडी व कोंबडय़ा दिल्या जातात. सामन्याच्या दिवशी मैदानात कोंबडय़ा आणि बकऱया आणून ठेवल्या जातात. स्पर्धेनंतर गावात झक्कास मेजवानीचा तिखट बेतही रंगतो. बकरे, गावठी कोंबडय़ा आणि अंडय़ांच्या स्वरूपात बक्षीस मिळणार म्हणून क्रिकेटपटू पारितोषिक जिंकण्यासाठी कस पणाला लावतात.

आपली प्रतिक्रिया द्या