IPL मध्ये खेळापेक्षा पैशांवर लक्ष, 11 मोसम खेळलेल्या खेळाडूच्या विधानाने क्रीडाविश्व हैराण

‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’ या म्हणीची आठवण सध्या क्रीडाप्रेमींना होत आहे. अर्थात याला कारण आहे स्टेन गन नावाने ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन. 11 मोसम खेळलेल्या डेल स्टेन याने इंडियन प्रीमिअर लीगपेक्षा पाकिस्तान सुपर लीग आणि लंका प्रीमिअर लीग चांगले असल्याचा जावईशोध लावला आहे.

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये खेळण्यासाठी जगभरातील क्रिकेटपटू उत्सुक असतात. अर्थात याला कारण म्हणजे येथे जगातील दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करता येते आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर होतो. तसेच या स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर आंतरराष्ट्रीय संघाची कवाडेही खेळाडूंसाठी उघडली जातात. मात्र दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने एक अजब विधान केले असून यामुळे क्रीडाविश्व हैराण झाले आहे.

डेल स्टेन सध्या पाकिस्तान सुप लीग (पीएसएल) खेळत असून एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने आयपीएलमध्ये खेळापेक्षा पैशांवर जास्त लक्ष दिले जाते असे विधान केले आहे. तसेच आयपीएलपेक्षा पाकिस्तान सुपर लीग आणि लंका प्रीमिअर लीग जगातील सर्वात मोटी क्रिकेट लीग असल्याची मुक्ताफळेही स्टेनने उधळली आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जेव्हा तुम्ही आयपीएल खेळायला जातात तेव्हा येथे खूप मोठी नावे आपल्याला दिसतात. हे खेळाडू क्रिकेट विसरून आपल्या कमाईवर लक्ष देतात. मात्र दुसरीकडे पीएलएल आणि एलपीएलमध्ये तुमचा फोकस क्रिकेटवरत असतो. मी देखील बऱ्याच काळापासून पीएसएल खेळत आहे. लोक माझ्या रुममध्ये येतात आणि फक्त क्रिकेटवर चर्चा करतात, असे डेल स्टेन म्हणतो.

तसेच मी जेव्हा हिंदुस्थानमध्ये जातो तेव्हा लोक माझ्या कामगिरीला विसरतात आणि मला यंदाच्या सत्रात किती पैसे मिळाले असे विचारतात. मला यापासून लांब रहायचे होते आणि खेळावर लक्ष केंद्रीत करायचे होते, असेही स्टेन म्हणाला. दरम्यान, स्टेन यंदा आयपीएल सीझन खेळणार नसून या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आपल्या संघाला याबाबत माहिती दिली होती. स्टेनने माघार घेतल्याने विराटच्या नेतृत्वाखालील आरसीबीने त्याला रिलीज केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या