एक खेळ मुक्या जीवांशी

160

प्रशांत येरम

झुंजी, शर्यती या आपल्या देशातील परंपराच. विविध प्रांतात या झुंजी कोणत्या स्वरुपात येतात ते पाहूया.

जगभरातील सर्व प्राण्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ प्राणी म्हणजे मनुष्यप्राणी. त्याच्याजवळ असलेल्या तल्लख बुद्धिने त्याने इतर प्राण्यांवर मात केली. पण हीच बुद्धी तो मुक्या प्राण्यांच्या जिवघेण्या शर्यतीमध्ये वापरायला लागला आणि त्याची मग इतरांना कीव कराविशी वाटू लागली. त्याने मग सुरू केला या मुक्या प्राण्यांमध्ये संघर्ष आणि त्याला गोंडस असे नाव दिले `शर्यत’. ही शर्यत त्या मुक्या प्राण्यांना काही वेळा इतकी जिव्हारी लागत असते की ते रक्तबंबाळ जरी झाले तरी मग हार न मानता आपला जीव जाईपर्यंत लढत `झुंज’ देत राहतात.

हिंदुस्थानात आज बऱयाच ठिकाणी प्राण्यांच्या शर्यती भरवल्या जातात. राजस्थानमध्ये हत्तीवरून पोलो हा खेळ राजेरजवाडय़ांच्या काळात खेळला जायचा. कर्नाटकात मुख्यत्वेकरून कोंबडय़ांची झुंज पाहायला मिळते. तर महाराष्ट्रात पुणे, सातारा, चाकण या ठिकाणी बैलांच्या जीवघेण्या शर्यती पाहायला मिळतात.

कोंबडय़ांच्या झुंजी

आंध्र प्रदेशमध्ये लागतात त्या कोंबडय़ांच्या झुंजी. हे कोंबडे इतके आक्रमक असतात की समोरच्या कोंबडय़ाला रक्तबंबाळ करून नामोहरम केल्याशिवाय दुसरा कोंबडा शांत बसत नाही. काही ठिकाणी तर कोंबडय़ांच्या चोचीला चक्क धार काढली जाते. का? तर त्याचा पराजय होऊ नये हीच महत्त्वाकांक्षा! आणि याच महत्त्वाकांक्षेपोटी बिचाऱया कोंबडय़ाचा जीव जातो. या शर्यतीत मोठय़ा प्रमाणावर सट्टेबाजी चालते.

पुण्यात पारनेरमध्ये लागतात त्या बैलगाडा शर्यती. या बैलांना वर्षभर ना शेतीसाठी वापरले जाते ना इतर कशासाठी त्यांना जो काही चारापाणी दिला जातो तो फक्त या आठवडाभर चालणाऱया बैलगाडा शर्यतीसाठीच. काही वर्षांपूर्वी म्हणजे २०११ मध्ये यावर बंदीही घातली होती. मात्र जत्रेच्या दरम्यान या स्पर्धा पुन्हा होतातच. ही बंदी उठवताना न्यायालयाने काही अटी व शर्तीही घातल्या होत्या.

परदेशातही प्रथा

परदेशात तर कोल्हा, डुक्कर, गाई, उंट यांच्या विविध स्पर्धा असतात. विशेष म्हणजे कोह्याच्या शर्यतीत एका कोह्याला बांधून ठेवले जाते आणि तो पळाल्यावर त्याला पकडण्यासाठी मग लोकांची धावपळ सुरू होते. दक्षिण अमेरिकेमध्ये तर डुकरांची शर्यत लागते. इथे मात्र डुक्करच पळत असतात. त्यांना नंबरिंग केलेले असते. यात एकावेळी चार ते पाच डुकरांना एका चौकोनामध्ये सिंगल राऊंड पळवले जाते. त्यातही वेगवेगळ्या कॅटेगरीज (वजनाच्या) असतात. इतकेच नव्हे तर येथे शेळ्यांच्याही अशाच प्रकारे शर्यती लागतात. शिवाय बदकांच्याही अशाच प्रकारच्या शर्यती पाहण्यासारख्या असतात.

उंटाच्या शर्यती

दुबईमध्ये उंटाच्या शर्यती होतात. हा खेळ तसा इजिप्त, बाहरीन, जॉर्डन, कतार, ओमान आणि ऑस्ट्रेलियामध्ये व्यावसायिक पद्धतीने खेळवला जातो. या स्पर्धेमध्ये उंटांचा पळण्याचा वेग हा साधारणपणे ताशी 40 किमी असतो.

जलिकुट्टी

तामीळनाडूतील जलिकुट्टी हा बैलांच्या शर्यतीचा प्रकार नुकताच वादात सापडला आहे. या खेळामध्ये बैलांना माणसाने नमवून त्याच्यावर विजय मिळवायचा असतो. तामीळनाडूमधील जलिकट्टू या खेळाला काही हजार वर्षांपासूनची परंपरा आहे. या खेळामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये बहुतांश वेळा माणूसच जखमी झाल्याची कैक उदाहरणे आहेत. तरीही हा खेळ आजही मोठय़ा उत्साहात येथे खेळला जातो. या खेळामध्ये वापरण्यात येणाऱया बैलांवर प्रचंड प्रमाणावर अत्याचार होतात. त्यांना प्रचंड प्रमाणावर रागीट स्वभावाचे बनवले जाते. आणि जेव्हा त्याचा उपयोग शर्यती वा झुंजीसाठी होणार नाही असे जेव्हा त्यांच्या मालकाच्या लक्षात येते तेव्हा मात्र त्यांना विकले जाते. आजही पश्चिम महाराष्ट्रात पुणे, जुन्नर, चाकण, सातारा या ठिकाणी अशा जीवघेण्या स्पर्धा घेतल्या जातात.

कुत्रेही अग्रक्रमावर

कुत्र्यांच्या शर्यतीमध्ये इंग्लंड अग्रक्रमावर आहे. यात विशिष्ट ट्रकवर कुत्र्यांना पळवले जाते. हे सर्व झाले मनोरंजनाचे प्रकार. पण आपण मनुष्यप्राणी या सर्व मनोरंजनाचा आस्वाद घेत असताना या मुक्या प्राण्यांचा मात्र  मुळीच विचार करत नाही. बैलांच्या शर्यतीमध्ये तर त्यांच्या तोंडातून फेस येईपर्यंत त्यांना पळवले जाते. कोंबडय़ाच्या शर्यतीत एकाचा जीव गेल्यावरच ही शर्यत थांबते. डुकरांच्या शर्यतीत त्यांना खाण्याचे आमिष दाखवून पळवले जाते. खरंच आपण आपल्या तल्लख बुद्धीचा वापर अशा क्रूरपणे जीवघेण्या खेळासाठी वापरायचा की नाही ही खरंतर आताची गरज आहे. आणि खरंच हे जेव्हा थांबेल तेव्हाच खऱया अर्थाने सर्वकाही सुजलाम् सुफलाम् होईल.

प्रशांत येरम

 

 

आपली प्रतिक्रिया द्या