पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन ‘दासीं’च्या मरणयातना

41

<<   पडसाद >>   मुजफ्फर हुसेन n  [email protected]

पाकिस्तानातील बहुसंख्य हिंदू आणि ख्रिश्चन गरीब आणि मजूर वर्गातील आहेत. पाकिस्तानची आर्थिक रचनाच अशी आहे की, त्यांना व्याजखोर जमीनदारांकडून कर्ज घ्यावेच लागते. हे कर्ज फिटू शकले नाही की, या कर्जदार हिंदू-ख्रिश्चनांच्या घरातील मुली आणि सुनांचे आधी अपहरण, नंतर धर्मांतर, पुढे निकाह आणि शेवटी वेश्या केले जाते. पाकिस्तानात अशा अपहृत हिंदू, ख्रिश्चन दासींची संख्या आजच्या घडीला २० लाख एवढी असेल.

आम्ही हिंदुस्थानी उपखंडात राहतो. या उपखंडात हिंदुस्थानशिवाय पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि ब्रह्मदेश आदी अनेक देश आहेत. एकाच उपखंडातील असल्यामुळे सर्व देशांतील सांस्कृतिक साम्य एवढे आहे की, हे कुणा अन्य देशांतील लोक असतील असे वाटतच नाही. केवळ धर्म बदलला असला तरी संस्कृती बदलत नाही, परंतु जेव्हा विदेशी दबावापोटी आपल्यापेक्षा विदेशी संस्कृतीस महान समजण्याची चूक करतो तेव्हा आम्हीच आमच्या हिंदुस्थानी संस्कृतीवर आघात केलेला असतो.

एकेकाळी हिंदुस्थानी उपखंडात हिंदुत्वाचे वातावरण होते, परंतु नंतर हिंदुस्थानी उपखंडातील नेपाळ, श्रीलंका, भूतान, तिबेट आणि सिक्कीम आदी प्रांतांत बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला. बहुसंख्य लोक बौद्ध धम्माचे अनुयायी झाले. तरीसुद्धा सांस्कृतिक संरचना मात्र कायम होती, परंतु देशविभाजनानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश हे प्रांत मुस्लिमबहुल झाले. कोणेएकेकाळी हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असलेल्या या प्रांतात आज ज्या संस्कृतीने पाय पसरले, त्यामुळे येथे आता सर्वांना न्याय मिळतोच असे नाही. तेथील लोक आता बरेच निष्ठुर झालेले दिसतात. त्यांच्या व्यवहारात अमानवीयता आहे.

पाकिस्तानात तर हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना दासी बनवून त्यांचे शोषण केले जाते. याचे मूळ कारण आजही तेथे जमीनदारी प्रथा जीवित आहे. तिथे आजही महिलांना दासी बनवण्याबाबत काहीही अडचण वाटत नाही. असे करणे चुकीचे आहे हेच ते मानायला तयार नाहीत. पाकिस्तानात एखाद्याला कर्ज घ्यायचे असेल आणि त्याच्या कुटुंबात महिला असेल तर कर्ज देणारा तिला अतिशय वाईट पद्धतीने वागणूक देतो. कर्ज घेणारा परिवार हिंदू असेल तर त्या घरातील महिलेवरील अत्याचाराला काही सीमाच राहत नाहीत. तिचा शीलभंग तर केला जातोच; शिवाय तिला मोठ्या प्रमाणात शारीरिक यातना सहन कराव्या लागतात आणि कष्टाची कामे करावी लागतात. त्यातून तिची सुटका मृत्यूशिवाय होतच नाही.

हिंदू किंवा ख्रिश्चन असलेल्या एखाद्या व्यक्तीने जर कर्ज घेतलेले असेल आणि त्याने ते वेळेत फेडले नाही तर मुस्लिम व्याजखोर त्याच्या घरातील महिलांना भरदिवसा चार चौघांदेखत उचलून नेतात. अपहृत महिलेला जीवनभर दासी आणि भोग्य बनून राहावे लागते. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात जेव्हा मोठ्या प्रमाणात बातम्या छापून आल्या तेव्हा पाकिस्तानात मोठा हलकल्लोळ माजला. हिंदुस्थानात या घटनांवर दुःख व्यक्त केले गेले असले तरी पाकिस्तानात मात्र व्याजखोर मुस्लिम आपल्या कृत्याबाबत वाईट वाटून न घेता, त्यात स्वतःचा गौरवच मानू लागले. पाकिस्तानातील ‘जंग’ नावाच्या वृत्तपत्रात जीवती नावाच्या एका महिलेची हकीकत मांडण्यात आली. या जीवतीच्या वडिलांनी एका जमीनदाराकडून ६७ हजार रुपये व्याजाने घेतले होते, परंतु ते वेळेत परत करता आले नाही तेव्हा मुस्लिम व्याजखोर जमीनदाराने त्याच्या घरून जीवतीचे अपहरण करून नेले. तिचे बळजबरीने धर्मांतर केले. नंतर तिच्याशी निकाह लावून घेतला आणि गेली १४ वर्षे ती त्याची पत्नी होती. जीवतीच्या आईचे म्हणणे आहे की, आता माझी मुलगी आयुष्यभरासाठी मुस्लिम व्याजखोराची वासना शांत करण्याचे साधन होऊन बसली आहे.

पाकिस्तानात जमीनदार कर्ज अशा पद्धतीने देतात की, कर्ज घेणाऱ्यास आयुष्यात कधीच फेड करता येऊ नये. दुसरीकडे पाकिस्तानातील आर्थिक परिस्थितीच अशी आहे की, तेथील गरीब हिंदूंवर कर्ज घेण्याशिवाय गत्यंतर नाही आणि हिंदू मुलींच्या नशिबी व्याजखोरांची ‘रखेल’ बनून कर्जफेड करीत मरणे हेच आहे. पाकिस्तानात हिंदू महिलांची घेवाणदेवाण संपत्तीच्या रूपात होते. जमीनदाराचा डोळा कर्जदाराच्या सर्व मुली आणि सुनांवर असतो. पाकिस्तानातील हे त्रस्त हिंदू टाहो फोडत जगभरच्या मानवाधिकारवाद्यांना साद घालत आहेत.  पाकिस्तानात व्याजखोरी हराम आहे, परंतु सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत करीत नाही.

जीवतीची आई अमिरी म्हणते, आम्ही जीवतीला वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी दाद मागितली. परंतु आमचे म्हणणे कुणीही ऐकले नाही. जीवती केवळ १४ वर्षांची असताना तिचे अपहरण आणि धर्मांतर करण्यात आले. आता आम्ही जिवंत असेपर्यंत तरी जीवतीची सुटका होणे शक्य नाही. आमच्या मृत्यूनंतरही तिची सुटका होईल असे दिसून येत नाही. व्याजखोरांनी ज्या दिवशी तिचे धर्मांतर केले त्या दिवशी मोठा जल्लोष केला होता.

जागतिक आकडेवारीनुसार २०१६ मध्ये पाकिस्तानात ज्यांचे कर्ज आणि पैशांच्या जोरावर अपहरण झाले होते अशा २० लाखांपेक्षा अधिक दासी आहेत. त्यात बहुतांश गरीब मजुरांच्या मुली आहेत. एक असे अनुमान आहे की, पाकिस्तानात प्रतिवर्षी किमान एक हजार हिंदू मुलींचे अपहरण केले जाते व अत्याचार केले जातात. पाकिस्तानातील ख्रिश्चन काँग्रेसचे अध्यक्ष नजीर एस. भट्टी यांचे म्हणणे आहे की, तरुणींचे अपहरण करण्यात त्यांच्या धर्मगुरूंचा मोठा हात असतो, त्यांना त्यांच्या वासना भागवायच्या असतात. त्यामुळे ते अशा धंद्यांना चालना देत असतात. जेव्हा त्यांचे मन भरते तेव्हा ते या मुलींना वेश्याव्यवसायाच्या नरकात ढकलून देतात.

हिंदू अधिकार कार्यकर्ते शंकर मेघावर यांचे म्हणणे असे की, जीवती असो वा जागो भिल्ल, या देशात मुस्लिमेतर महिलांच्या नशिबी हेच भाग्य लिहून आलेले असते की, त्यांचे अपहरण होणार आणि त्यांच्यावर अत्याचार होणार. सैतानांचा हा नित्यक्रमच आहे. कायद्याने १८ वर्षांखालील मुलींचा विवाह अवैध मानला जातो, परंतु पैशांपुढे गरीबांचे काय चालणार! यदाकदाचित एखादे प्रकरण कोर्टात जाते. त्यावेळी या मुलींचे वय १३ वर्षांपेक्षा अधिक नसते. खूपच प्रकरण लावून धरले गेले की, असे सांगितले जाते की, आता त्यांनी इस्लाम स्वीकारला आहे, त्यामुळे आता आम्ही काही करू शकत नाही.

अशा प्रकरणातील ९९ टक्के मुलींचे वय हे १३ वर्षांपेक्षा कमीच असते. एका अनुभवी पोलीस अधिकाऱ्याचे असे म्हणणे आहे की, १३ ते १५ वर्षे वय असलेल्या मुलींच्या बहुतांश प्रकरणांत न्यायालये प्राधान्याने गप्पच राहतात. मग शोषिताने जावे तरी कुठे! विशेष म्हणजे ‘पाकिस्तान’ हे नाव मुस्लिमांनी दिले त्याचा अर्थ ‘पवित्र धरती’ असा होतो. लोक परमेश्वराकडे हात पसरून केवळ एवढेच म्हणतात की, हे दिवस पाहण्यासाठी तू आम्हाला या पापी धरतीवर जन्म दिला होतास काय! हे परमेश्वरा, ही पापी धरती जिला पाकिस्तान म्हटले जाते ती केवळ याकरिता बनली आहे काय, जिथे केवळ जीवती आणि जागोसारख्या मुलींचे स्त्रीत्व लुटले जावे!

आपली प्रतिक्रिया द्या