Video – हात जोडून माफी मागतो! केजरीवालांनी पंतप्रधानांसमोर मान्य केली चूक

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संवाद साधला. हा संवाद व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीसाठीचे प्रोटोकॉल मोडत या बैठकीचा काही हिस्सा थेट प्रक्षेपित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आक्षेप घेतला. यामुळे केजरीवाल यांनी आपली चूक मान्य करत हात जोडत माफी मागितली. यापुढे असं होणार नाही याचे आश्वासनही त्यांनी दिले.

पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका होत असतात. कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी, राज्यांची मते आणि अडचणी जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीने बैठका आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत. या बैठकीचे थेट प्रक्षेपण करत केजरीवाल यांनी ही बैठक सार्वजनिक करण्याचा प्रयत्न केला. केजरीवाल यांनी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित व्हावा यासाठी टँकर हवाई मार्गाने पोहोचवावेत अशी मागणी करायला सुरुवात केली होती. ही पाऊले केंद्र सरकारने आधीच उचलली असल्याचे केंद्र सरकारतर्फे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना कळवण्यात आले. केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री या नात्याने मागणी करत असताना बैठकीचे थेट प्रक्षेपण करायला सुरुवात केली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना मध्येच थांबवत बैठकीचे थेट प्रक्षेपण करणे हे परंपरा आणि प्रोटोकॉलच्या विरोधात असल्याचं म्हटलं. यावर केजरीवाल यांनी हात जोडून माफी मागितली आणि यापुढे या गोष्टीचे भान ठेवू असं आश्वासन दिलं.

या सगळ्या प्रकरणावर दिल्ली सरकारतर्फे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून बैठकीचे थेट प्रक्षेपण करावे अथवा नाही याचे लेखी किंवा मौखिक असे कुठल्याही प्रकारचे आदेश-निर्देश नसल्याने थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. केजरीवाल यांनी या बैठकीमध्ये दिल्लीच्या वाट्याला जेवढा ऑक्सिजन यायला हवा तेवढा येत नसल्याची तक्रार केली. जर दिल्लीत ऑक्सिजन निर्माण करणारे कारखाने नसतील तर दिल्लीच्या 2 कोटी जनतेला ऑक्सिजन मिळणारच नाही का असा सवाल केजरीवाल यांनी विचारला होता.

आपली प्रतिक्रिया द्या