दांडी मारणाऱ्या मंत्र्यांची नावे द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची कठोर भूमिका

56

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

खासदारांनी समाजात मिसळावे आणि जनतेच्या समस्या समजून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली. त्यात मोदी यांनी हे आवाहन केले. तसेच मंत्र्यांचा कामाचा आढावा घेत त्यांनी काम टाळणाऱ्या मंत्र्याविरोधात त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. कामांवर न येणाऱ्या मंत्र्यांची नावे आपल्याला द्या, आपण त्यांना समज देऊ असे त्यांनी सांगितले. मंत्री सदनात उपस्थित नसल्याने विरोधी पक्षाकडून तक्रारी करण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या बैठकीत खासदारांना आणि मंत्र्यांना काम करण्याच्या पद्धतीबाबत पंतप्रधानांनी सूचना केल्या. आपल्या मतदारसंघातील जनतेची कामे खासदारांनी तत्परतेने करावीत, तसेच आपल्या कामात नाविन्य आणावे आणि वेगळेपणा जपावा असेही मोदी यांनी सांगितले. वातावरणामुळे साथीचे रोग मोठ्या प्रमाणात पसरतात. पावसाळ्यात साथींच्या रोगांना आवर घालण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या वर्षात मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरल्याचे त्यांनी सांगितले. देशभरात 115 जिल्हे मागास असून त्या ठिकाणी कामांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

कामावर न येणारे खासदार आणि मंत्र्यानाही पंतप्रधानांनी धारेवर धरले. रोस्टरप्रमाणे जे मंत्री कामावर उपस्थित राहत नाहीत, त्यांची नावे मला द्या. त्यांना आपण समज देऊ, सर्वांकडून काम कसे करून घ्यायचे ते आपल्याला माहित आहे, असेही ते म्हणाले. लोकसभा आणि राज्यसभेत मंत्र्यांना दोन तासांसाठी ड्युटी लावण्यात येते. अनेकदा संबंधीत मंत्री उपस्थित नसल्याने विरोधी पक्षाकडून पत्र पाठवून तक्रार करण्यात येते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे खासदार आणि मंत्र्यांनी संसदेत चर्चेवेळी उपस्थित राहावे, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या