बाप्पा पावला! आशा, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ

342
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

येत्या ऑक्टोबरपासून आशा, अंगणवाडी सेविकांचे मासिक मानधन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. हे मानधन नोव्हेंबर म्हणजे दिवाळीपासून मिळणार आहे. गणपती उत्सवाच्या तोंडावर ही गुड न्यूज मिळाल्याने आशा, अंगणवाडी सेविकांना बाप्पा पावला आहे.

देशभरातील आशा, अंगणवाडी सेविका आणि नर्स सहाय्यक महिलांशी मोदी यांनी व्हिडीओवरून आज संवाद साधला तेव्हा त्यांनी ही घोषणा केली.

मोफत विमा
‘आशा’ सेविकांना विविध सामाजिक सुरक्षा योजनेखालील आणण्यात येईल. तसेच आशा सेविका कार्यकर्ते यांना प्रधान मंत्री जीवन ज्योती योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेखाली मोफत विमा उतरविण्यात येईल. याशिवाय आशा सेविकांचे काही विपरीत घडल्यास त्यांना चार लाख रुपये देण्याची घोषणाही पंतप्रधनांनी केली आहे.

अशी असेल मानधन वाढ
सध्या ज्यांना तीन हजार रुपये मासिक मानधन मिळते त्यांना आता 4,500 रुपये मासिक मानधन मिळेल. ज्यांना 2,200 रुपये मिळतात त्यांना 3,500 रुपये तर अंगणवाडी सहाय्यकांचे मानधन 1500 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात येईल. याशिवाय आशा आणि अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारतर्फे प्रोत्साहन भत्ता दिला जातो. हा प्रोत्साहन भत्ता राज्य सरकारेही देतील, असे स्पष्ट केले आहे.

अंगणवाडय़ांमध्ये एक कोटी बोगस लाभार्थी
देशात 14 लाख अंगणवाडय़ा आहेत. यातील लाभार्थ्यांची संख्या 10 कोटी आहे. पण यापैकी एक कोटी लाभार्थ्यांची नोंदणी बोगस झाल्याचे आढळून आले आहे आणि अशा बोगस लाभार्थ्यांची नावे यादीमधून हटविण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी आज केली. अंगणवाडय़ांमधील लाभार्थी हे सहा वर्षांखालील मुले-मुली, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱया माता आहेत.

summary : PM Modi announces hike in remuneration of ASHA, Anganwadi workers

आपली प्रतिक्रिया द्या