खलिस्तानच्या मुद्यावर पंतप्रधान मोदींनी ट्रुडोंना सुनावले

51

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

खलिस्तानी दहशतवाद्यांना सहानभूती देण्याच्या धोरणामुळे वादात सापडलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता सुनावले आहे. जस्टीन ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या संयुक्त वार्तालापात मोदींनी ट्रुडो सरकारच्या धोरणावर नाव न घेता टीका केली.

 ‘देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व यांना आव्हान देणाऱ्यांना सहन केले जाणार नाही. विभाजनाची दरी निर्माण करणाऱ्यांनाही देशात कोणती जागा नसेल’ असे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले. हिंदुस्थान आणि कॅनडामध्ये अनेक मुद्यांवर सहमती झाली आहे. संरक्षण सहकार्यावर भर देण्याचा दोन्ही देशांचा भर आहे. दहशतवाद आणि कट्टरवादाचा हिंदुस्थान आणि कॅनडा सारख्या लोकशाही देशांना धोका असून याचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मोदींनी यावेळी सांगितले.

वाचा – खलिस्तानी दहशतवादी राजरोसपणे हिंदुस्थानात!

कॅनडामध्ये एक लाख २० हजारांपेक्षा जास्त हिंदुस्थानी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच कॅनडा हा हिंदुस्थानला युरेनियम पुरवठा करणारा मोठा देश असल्याचा उल्लेखही मोदींनी आपल्या भाषणात केला. हिंदुस्थान आणि कॅनडामध्ये गुरुवारी सहा विषयांवर द्विपक्षीय करार झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या