मोदींच्या रोड शोमध्ये पोस्टर हटवण्यावरून वादावादी

27

सामना ऑनलाईन, वाराणसी

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू आहे. ज्या भागातून हा रोड शो जातोय त्याच भागातून अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांचाही रोड शो जाणार आहे. त्यामुळे या भागात अनेक ठिकाणी भाजप आणि सपाचे पोस्टर्स लावण्यात आले आहे. मोदी यांच्या रोड शो दरम्यान अखिलेश आणि राहुल गांधी यांचे पोस्टर्स हटवण्यावरून भाजपा आणि काँग्रेस तसेच सपा कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.

modi-in-varanasi

या भागातील भैरवनाथ चौकात सपा आणि कॉंग्रेसचा एक स्वागतकक्ष उभारण्यात आला होता. मोदींचा रोड शो या भागातून जाणार असल्याचं कारण देत भाजप कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर हा स्वागतकक्ष काढण्यात आला. राहुल आणि अखिलेश यांचं एक पोस्टर विश्वनाथ मंदिरासमोर असणा-या एका मशिदीवर लावण्यात आलं होतं. भाजप कार्यकर्त्यांनी अशी पोस्टर्स मशिदीवर लावू शकत नसल्याचं सांगत ते पोस्टरही काढून टाकलं.

या घटनेनंतर सपाच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकार जाणीवपूर्वक दडपशाही करत असल्याचा आरोपही करण्यात आला. दुसरीकडे सोनारपूर भागात मोदींच्या रोड शोपुढे सपाचा रोड शो सुरू आहे. सपाच्या रोड शोचं नेतृत्व माजी खासदार राजेश मिश्रा करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या