‘भिम अॅप’ शिकवा, दणदणीत पैसे कमवा; मोदींची कॉर्पोरेट आयडिया

58

सामना ऑनलाईन । नागपूर

नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवस्था मजबूत करण्यासाठी ‘भिम अॅप’ लॉन्च करण्यात आले. हे अॅप अद्यापही हिंदुस्थानातील अनेकांनी डाऊनलोड केलेले नसल्याने त्यांना कॅशलेस व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर उपाय म्हणून पंतप्रधान मोदींनी ‘कॉर्पोरेट’ मार्केटिंग फंडा वापराया सुरुवात केली असून ‘भिम अॅप’ शिकवा, दणदणीत पैसे कमवा अशी साद घातली आहे.

सध्या सुट्ट्यांचा मौसम आहे. तेव्हा सुट्ट्यांमध्ये अनेक तरुण-तरुणी छोटी-मोठी कामं करून पैसे कमवतात, पुढलं शिक्षण-छंद यासाठी त्याचा वापर करतात. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने तरुण-तरुणींसाठी एक योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत १४ एप्रिल ते १४ ऑक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत जे तरुण-तरुणी इतरांना ‘भिम अॅप’ डाऊलोड करून देतील आणि त्यावरून तीन ट्रान्झॅक्शन केले जातील त्यांना त्या व्यक्तीमागे १० रुपये मिळतील. ही रक्कम थेट खात्यात जमा करण्यात येईल. त्यामुळे महिन्याला १०-१५ हजार रुपये कमवणे शक्य होईल, असे मोदींनी सांगितले. तसेच जे व्यापारी भिम अॅपच्या आधारावर व्यवहार करतील त्यांना विशिष्ट व्यवहार पूर्ण झाल्यावर २५ रुपये मिळतील, असेही ते म्हणाले.

देशात नोटाबंदी करण्यात आल्यानंतर कॅशलेस व्यवहारांमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला असून ‘भिम अॅप’चा वापर म्हणजे एक प्रकारे भ्रष्टाचाराविरोधातील लढाई आहे, असे मोदी म्हणाले. देशातील लोकांनी नोटाबंदीनंतर भिम अॅपवरून व्यवहार सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाल्याची काही उदाहरणे मोदींनी आपल्य़ा भाषणातून सांगितली. संसदेत अनेकांनी कारणं दिली की लोकांकडे स्मार्ट फोन नाहीत, तर आम्ही सांगितलं की हे साध्या फोनवरून शक्य आहे. पण आता तर कोणताही फोन नसला तरी चालेल. तुमचे बँक खाते आधारशी जोडले असेल तर तुमचा अंगठा व्यापाऱ्याकडे असलेल्या मशिनवर ठेवला की तुमच्या खात्यातून योग्य रक्कम व्यापाऱ्याच्या खात्यात पोहोचेल. त्यामुळे फोन शिवाय देखील तुम्हाला व्यवहार शक्य होईल, असे मोदी म्हणाले. पूर्वी अंगठा वापरणं कमीपणाचे वाटायचे पण आता अंगठा शक्तीचे केंद्र बनला आहे, टेक्नोलॉजीने अंगठ्याला ताकद दिली असल्याचेही ते म्हणाले.

एटीएमच्या सुरक्षेसाठी लोकं लागतात. पण भिम अॅपमुळे तुमचा मोबाईल बँक बनेल. प्रिमायसेस लेस आणि पेपरलेस बँकिंगच्या दिशेने आपण चाललो आहोत. भिम आधार सारखी व्यवस्था फक्त हिंदुस्थानकडे आहे. आपली वाटचाल उत्तम दिशेकडे सुरू असून ‘भिम आधार’चा अभ्यास करण्यासाठी विश्व इथे येईल. वैश्विक आर्थिक बदलासाठी हा आधार बनेल, असेही त्यांनी सांगितले. ‘भिम अॅप’ वापरतील ते भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे सैनिक असतील, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या