मोदींची विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’, द्रविड, कुंबळे, लक्ष्मणच्या ‘स्पिरिट’चं दिलं उदाहरण

711

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी टीम इंडियाचा माजी खेळाडू ‘द वॉल’ राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या स्पिरिटचे उदाहरण मुलांना दिले.

‘परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमादरम्यान राजस्थानमधील एका विद्यार्थिनीने परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि तणाव कमी करून याचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करा असे आवाहन मोदींना केले. याला उत्तर देताना मोदींनी क्रिकेटदरम्यान घडलेल्या दोन घटना सांगितल्या. यातील पहिली लढत 2001 मध्ये हिंदुस्थानविरुद्ध ऑस्ट्रेलिया, तर दुसरी लढत 2002 मध्ये हिंदुस्थानविरुद्ध वेस्टइंडीज अशी रंगली होती.

2001 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ हिंदुस्थान दौऱ्यावर होता. कोलकाताच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्स मैदानावर दोन्ही संघात कसोटी सामना रंगात आला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या. त्यानंतर हिंदुस्थानचा पहिला डाव 171 धावांमध्ये गुंडाळला आणि फॉलोऑन दिला. या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ ठरणार असेच वाटत होते. परंतु अशा दबावाच्या स्थितीमध्ये राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दमदार खेळी केली. द्रविडने 180 तर लक्ष्मणने 281 धावा चोपल्या आणि टीम इंडियाला दबावाच्या स्थितीतून बाहेर काढले. यानंतर टीम इंडियाने हा सामना 171 धावांनी जिंकत इतिहास घडवला. या लढतीचा मोदींनी उल्लेख करत दवाबात आणि तणावात समस्यांचा कसा सामना करावा हे सांगितले.

दुसऱ्या घटनेमध्ये मोदींनी फिरकीपटू अनिल कुंबळे याचा उल्लेख केला. 2002 मध्ये अनिल कुंबळे यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध खेलताना हनुवटीवर चेंडू लागल्यावरही बँडेज बांधून गोलंदाजी केली होती. कुंबळेचे त्यावेळी कौतुक झाले होते. चेहऱ्यावर पट्टी बांधलेल्या कुंबळेने त्या परिस्थितीतही विंडीजच्या ब्रायन लाराची महत्त्वपूर्ण विकेट काढली होती. याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, त्यावेळी कुंबळे खेळला नसता तरीही त्याला कोणीही काहीही बोलले नसते. परंतु त्याच्या विकेटने सामना फिरवला. आपण केलेला संकल्प आणि तो पूर्ण करण्यासाठी दृढनिश्चय आपल्याकडे असेल तर काहीही अशक्य नाही, असेही मोदी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या