#AYODHYAVERDICT- राम मंदिरानंतर आता राष्ट्रनिर्माणासाठी एकत्र या – नरेंद्र मोदी

1314

अयोध्येतील राम मंदिर जन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. निकालाचा शांततेने स्वीकार केल्याबद्दल त्यांनी देशवासीयांचे आभार व्यक्त केले. तसेच, त्यांनी न्यायव्यवस्थेचेही अभिनंदन केले. या प्रकरणी निकाल देण्याचे अतिशय अवघड काम न्यायव्यवस्थेने केले आहे. नव्या हिंदुस्थानात कटुता, भीतीला थारा नसल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. तसेच आता राम मंदिरानंतर देशवासियांनी राष्ट्रनिर्माणासाठी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्र निर्मितीची जबाबदारी वाढली आहे. कोट्यावधी देशवासियांनी आज इतिहास रचला आहे. इतिहासात एक सुवर्ण पान जोडले गेले आहे. आज देशासमोर अनेक समस्या आहेत. त्या समस्या दूर करून विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे देशाच्या आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मोदी यांनी देशवासियांना केले. आपल्याला नवा हिंदुस्थान निर्माण करायचा आहे. या राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात कटुतेला अजिबात स्थान असणार नाही. ‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास’ हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे, असेही ते म्हणाले.

आज सर्वोच्च न्यायलायने अयोध्येच्या या महत्त्वपूर्ण प्रकरणी निकाल दिला आहे. यामागे शेकडो वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. संपूर्ण देशाची ही इच्छा होती की, या प्रकरणाची न्यायालयात रोज सुनावणी व्हावी व ती झाली आणि आज न्यायालयाने निकाल दिला आहे. अनेक दशके सुरू असलेल्या न्यायप्रक्रियेची आज सांगता झाली. संपूर्ण जग हे मान्य करते की, हिंदुस्थान जगातील सर्वात मोठा लोकाशाही देश आहे. मात्र, हिंदुस्थानची लोकशाही जिवंत व मजबूत आहे, हे आज जगासमोर आल्याचे ते म्हणाले. न्यायालयाचा निर्णय़ आल्यानंतर ज्या प्रकारे समाजातील प्रत्येक वर्गाने, प्रत्येक समुदायाने, प्रत्येक पंथाच्या नागरिकांसह देशाने खुल्या मनाने याचा स्वीकार केला. याद्वारे देशाची संस्कृती, सद्भावना आणि एकता दिसून येते. हिंदुस्थानात विविधतेत एकता असल्याचा प्रत्यय जगाला आला आहे, असेही मोदी म्हणाले.

यावेळी मोदी यांनी बर्लिनचा दाखला दिला. आज 9 नोव्हेंबर आहे आणि आजच्याच दिवशी बर्लिनची भिंत पाडण्यात आली होती. दोन विरुद्ध विचारधारांना बाजूला सारत एकजुटीचा संकल्प करण्यात आला होता. तोच योग आजही जुळून आला आहे. आजच 9 नोव्हेंबरच्या दिवशी करतारपूर कॉरिडॉरचीही सुरुवात करण्यात आली. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांच्या सहकार्याने कॉरिडॉर खुले करण्यात आले. त्यामुळे ही तारीख अनेक अर्थांनी आपल्याला एकत्र येत पुढील वाटचालीचा संदेश देत आहे, असे ते म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या