विरोधकांना मोदींची सणसणीत चपराक, ‘कश्मीर आणि महाराष्ट्राचा संबंध काय’ वर दिलं उत्तर

#MahaElection 2019 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय सभांमधून आरोपप्रत्यारोप आणि विविध मुद्द्यांवरून फैरी जडत आहेत. अशातच विरोधकांनी सत्ताधारी पक्षांना महाराष्ट्राच्या निवडणुका असताना कलम 370 हटवल्याचा मुद्दा लावून धरल्याने लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा जम्मू-कश्मीरशी काय संबंध? असे प्रश्न सातत्याने केले जात असताना, सोशल मीडियावरून त्याची खिल्ली उडवली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विरोधकांना सणसणीत उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील वीर जवानांनी जम्मू-कश्मीरच्या शांततेसाठी बलिदान दिले आहे, असा एकही जिल्हा इथे सापडणार नाही जिथून जवान जम्म-कश्मीरच्या रक्षणासाठी गेलेला नाही. असे असतानाही महाराष्ट्र आणि जम्मू-कश्मीरचा संबंध काय असे विचारणाऱ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे, अशी चपराक मोदींनी लगावली.

कलम 370 हटवल्यानंतर देशातील जनता आनंदात आहे मात्रा विरोधाकांचे तेज निघून गेले आहे, त्याचे चेहरे पडलेले आहेत. ते अत्यंत दु:खी आहेत. अनेक वर्षांपासून सांभाळून ठेवलेले 370चे देशातील जनतेच्या सेवेसाठी बलिदान देण्यात आले आहे. विरोधकांना एक भारत श्रेष्ठ भारत मंजूर नाही. त्यांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी तुकडे पडलेला हिंदुस्थान पाहिजे. त्यांना विखरलेला, एकदुसऱ्याशी लढणारा हिंदुस्थान पाहिजे, असा सणसणीत आरोप त्यांनी यावेळी केला. आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी अनेक वर्ष डावपेच आखले, पण आता सारे डावपेच निष्क्रिय ठरत असल्याचे ते म्हणाले.

वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीवर आज विरोधक राजकीय स्वार्थासाठी देशविरोधी विधानं करत आहेत. आणि हे किती निर्लज आहेत पाहा, हे जाहीरपणे बोलताहेत की महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये जम्मू-कश्मीर, लडाख आणि 370 चा विषय कशासाठी आणला जात आहे? कलम 370शी महाराष्ट्राचं काय देणंघेणं? जम्मू-कश्मीरचं महाराष्ट्राशी काय देणंघेणं? अशी गोष्टी बोलणाऱ्यांनो कान उघडे ठेवून ऐका, जम्मू-कश्मीर आणि तिथले नागरिकही हिंदुस्तानचे सुपुत्र आहेत. सीमेपलिकडून होणारे हल्ले आणि त्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे. महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा नाही जिथून गेलेल्या वीर सुपुत्रांनी जम्म-कश्मीरच्या रक्षणासाठी, शांततेसाठी त्याग केला नसेल. मृत्यूला तळहातावर घेऊन महाराष्ट्रातील वीर जवान त्या हिम शिखरांवर, जम्मू-कश्मीरच्या भूमीवर दहशतवाद्यांविरुद्ध लढतात कारण त्यांच्या मनात स्पष्ट असते की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून येतो आणि माझ्या हिंदुस्थानला छोटीशी जखम देखील मी होऊ देणार नाही. जीवाची बाजी लावेन पण देशाचे रक्षण करेन, या मंत्रासह महाराजांच्या भूमीतील वीर जवान आतापर्यंत जम्मू-कश्मीरमध्ये बलिदान देत आले आहेत. मला महाराष्ट्राच्या या शहिदांवर गर्व आहे, ज्यांनी जम्मू-कश्मीरसाठी प्राण दिले, असे मोदी म्हणाले.

पण आज राजकीय स्वार्थात बुडालेले, आपल्या कुटुंब कल्याणात मग्न असलेले हे विरोधक हे बोलण्याची हिम्मत करतात की महाराष्ट्राचे जम्मू-कश्मीरशी काय देणंघेणं? डूब मरो… डूब मरो… डूब मरो… असं मोदी म्हणताच सभेतील लोकांनी जल्लोष करत मोदींना समर्थन दिले.

विरोधकांची ही अशी विधानं ऐकून दु:ख होते. त्यांना त्यांच्या विचारांची लाज वाटली पाहिजे. त्यांना आपल्या विधानांची लाज वाटली पाहिजे, असे म्हणत त्यांनी इशारा दिला की, तुमची प्रतिक्रिया विधानं सारा देश ऐकतो आहे आणि देश पै पैचा हिशोब मागेल.

वोट बँकेच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे नुकसान!

वोट बँकेच्या अशा राजकारणामुळेच महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले. पूर्वीच्या सरकारच्या काळात दरदिवशी बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया व्हायच्या. पण त्यातील आरोपी पळाले, शत्रू राष्ट्रांमध्ये ते लपून बसले. आज देश विचारतो आहे की, इतके मोठे गुन्हेगार कसे पळाले, हा प्रश्न देश विचारत आहे. मात्र आता त्यातील नवीन पानं समोर येऊ लागली आहेत. त्यांच्याशी कुणाचे कसे संबंध होते, व्यवहारिक संबधित कसे होते. महाराष्ट्राच्या नेत्यांना हे माहीत होते की त्यांचे हे उद्योग जनतेसमोर येतील. त्यामुळे घाबरलेल्या या लोकांनी काही महिन्यांपासून तपास यंत्रणांवर राजकीय आरोप करणे सुरू केले होते. मात्र आता वेळ बदलली आहे. प्रत्येक उद्योगाचे उत्तर देश नक्की घेईल, असे ही त्यांनी ठणकावून सांगितले.

यंदाच्या निवडणुकीत देखील जनता विरोधकांना पाडेल आणि महायुतीलाच बहुमताने जिंकून आणेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या