काँग्रेसची हार म्हणजे देशाचा पराभव कसा? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल

37

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’मुळेच पराभव झाला असे काँग्रेसचे समजणे हा मतदारांचा अपमान आहे. वायनाड, रायबरेली, बहरामपूर, तिरुवनंतपुरममध्ये हिंदुस्थान हरला का? काँग्रेस पक्षाची हार म्हणजे देशाचा पराभव कसा? असा खडा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. सुमारे एक तासाच्या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षाचे वाभाडे काढले. 40 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान असताना लोकांनी रांगेत उभे राहून मतदान केले. 80 वर्षांचे ज्येष्ठ नागरिकही रांगेत उभे होते. यंदा पहिल्यांदाच पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही मतदानात भाग घेतला. असे असताना निवडणुकांवर आक्षेप घेऊन काँग्रेस पक्ष जनतेचा अपमान करीत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेसचा पराभव म्हणजे देशाचा पराभव समजणे हा अहंकार आहे. अशा प्रकारची भाषा वापरणे म्हणजे देशातील मतदारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासारखे आहे. 2014 पासून काँग्रेस पराभव मान्य करायला तयार नाही. ईव्हीएम घोटाळ्यामुळे पराभव होत असल्याचे काँग्रेसला वाटले. मग मध्य प्रदेशात तर काँग्रेस जिंकली त्याला काय म्हणावे? काँग्रेसला विजयही पचवता येत नाही आणि पराभवही स्वीकारता येत नाही, असा टोला पंतप्रधानांनी लगावला.

सरदार पटेल पहिले पंतप्रधान झाले असते तर कश्मीर प्रश्न राहिला नसता

सरदार वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान झाले असते तर जम्मू-कश्मीरचा प्रश्न राहिलाच नसता. काँग्रेस सरदार पटेलांना विसरली. आम्ही गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी निर्माण केले. काँग्रेसने तेथे पक्षाची बैठक घ्यावी असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान काय म्हणाले?

1977 मध्ये ईव्हीएम मशीनवर चर्चा झाली. 1982 मध्ये पहिल्यांदा ‘ईव्हीएम’चा प्रयोग देशात झाला. 1988 मध्ये ईव्हीएमद्वारे निवडणुका घेण्यास संसदेने मान्यता दिली. काँग्रेसनेच ईव्हीएम आणली, नियम बनविले. आता पराभूत झालात म्हणून गळा काढत आहात का? आतापर्यंत देशात विधानसभेच्या 113 आणि लोकसभेच्या चार निवडणुका झाल्या. ईव्हीएम मशीन योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयानेही दिला आहे.

  • ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा आहे असे आम्हालाही सुरुवातीला वाटत होते. पण आम्ही सर्व गोष्टी समजून घेतल्या आणि ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा नसल्याची खात्री पटली.
  • निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना ‘ईव्हीएम’ घोटाळा दाखविण्याचे आव्हान दिले होते. एनसीपी आणि सीपीआय वगळता कोणीही आयोगाकडे गेले नाही.
  • न्यू इंडियाला विरोध करणाऱ्यांना ओल्ड इंडिया हवा आहे. घोटाळे करण्यासाठी रान मोकळे देणारा ओल्ड इंडिया हवा. नोकरीच्या नावाने भ्रष्टाचार करणारा, पासपोर्टच्या रांगेत तासन्तास उभे करणारा ओल्ड इंडिया विरोधकांना पाहिजे.
  • ज्या पक्षांनी जीएसटी, ईव्हीएम, व्हीव्हीपॅटला विरोध केला त्यांना जनतेने शिक्षा दिली आहे.
  • देशातील मीडिया पक्षपाती आहे, अशी टीका विरोधक करतात. तामीळनाडू, केरळमध्ये ‘मीडिया ऑन सेल’ आहे का?
  • दिल्लीत शिखांचे शिरकाण करणाऱ्यांनी आम्हाला उपदेश देऊ नये. हे लोक आजही काँग्रेसमध्ये मोठय़ा पदावर आहेत.
  • राज्यसभेत आमचे बहुमत नाही हे आम्हाला माहीत आहे. गेली पाच वर्षे आम्ही बरेच काही सोसले. बहुमत नसल्याने देशाचे नुकसान झाले याचे आम्हाला दुःख आहे.

मॉब लिचिंगच्या घटना वेदनादायी

झारखंडमधील मॉब लिचिंगच्या घटनांवर पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. मॉब लिचिंग करणे चुकीचेच आणि वेदनादायी आहे. काही लोक झारखंड हा मॉब लिचिंगचा अड्डा बनला असल्याचा आरोप करतात. पण संपूर्ण झारखंडला बदनाम कसे करता येईल? झारखंडमध्ये सज्जन लोकही राहतात. सर्व प्रकारच्या हिंसाचाराला समान समजून झारखंड असो पश्चिम बंगाल की केरळ येथे दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली पाहिजे. मॉब लिचिंगच्या घटनांचा राजकारणासाठी वापर कोणी करू नये असे पंतप्रधानांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या