लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप, मिंधे आणि अजितदादा गटाची दाणादाण उडवली होती. आता विधानसभा निवडणुकीतही धडाकेबाज प्रचाराची रणनीती महाविकास आघाडीकडून आखण्यात येत आहे. त्याचवेळी पराभवाच्या भीतीने भाजप आणि महायुतीची गाळण उडाली असून शहांच्या फौजा प्रचारासाठी उतरवून महाराष्ट्रावर आक्रमण करण्याची तयारी दिल्लीतून केली जात आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी 8, अमित शहा 20, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 15 तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 40 सभा घेणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभांचे नियोजनही केले जात आहे.
भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सोपविली आहे. यामध्ये 40 नेत्यांचा समावेश असून 20 केंद्रीय नेते आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, पियुष गोयल, माजी खासदार स्मृती इराणी, भाजपचे संयुक्त राष्ट्रीय सरचिटणीस शिव प्रकाश यांच्या प्रचारसभाही महाराष्ट्रात होणार आहेत.
दिवाळी संपताच भाजप राज्यात प्रचार सुरू करणार आहे. भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या 100 पेक्षा जास्त सभा घेतल्या जाणार आहेत. प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीच्या गादीकडे पाठ करून महाराष्ट्रात तंबू ठोकणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात सलग आठ दिवस सभा होणार आहेत. यासाठी 7 ते 14 नोव्हेंबरदरम्यान मोदी महाराष्ट्रात असतील.
मुख्यमंत्र्यांची फौजही चालून येणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी प्रचारासाठी महाराष्ट्रावर चालून येणार आहेत.