पंतप्रधान मोदी ईश्वराचे रूप, 500 वर्षात जे कोणाला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं!

2814

पंतप्रधान मोदी मानवाच्या रूपातील ईश्वर आहेत, असे उद्गार दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी काढले आहेत. इंद्रपुरीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राम मंदिर उभारणीबाबत चर्चेवर बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. ‘पंतप्रधान मोदी मानव आहेत, मात्र मानवाच्या रूपातील ईश्वर आहेत. कारण 500 वर्षात जे कोणाला जमले नाही ते त्यांनी करून दाखवले’, असे आदेश गुप्ता म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच आदेश गुप्ता यांनी हे विधान केले आहे. 5 ऑगस्टला मोदींच्या हस्ते चांदीची वीट रचून भूमिपूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तसेच संत-महंत असे जवळपास 200 लोक सहभागी होणार आहेत.

मजबूत घेरेबंदी
पंतप्रधान मोदी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अयोध्येची नाकेबंदी करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. 4 ऑगस्ट पासून अयोध्येत जाणारे मार्ग बंद करण्यात येणार असून कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही.

तयारी जोरात
दरम्यान, अयोध्येत भूमिपूजन कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. संपूर्ण अयोध्या नगरी भगव्या-पिवळ्या रंगात रंगवली जात असून भिंतीवर रामायणातील कथा चित्रित केल्या जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जातीने याकडे लक्ष देत असून तयारीचा आढावा घेत आहेत. 5 शतकानंतर हा क्षण आल्याचे आदित्यनाथ काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या