पंतप्रधानांच्या चांगल्या कामांचे कौतुक करायला हवे; काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याची मोदींवर स्तुतीसुमने

1415

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चांगल्या कामांचे कौतुक करायला हवे, असे मत व्यक्त करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुस्तीसुमने उधळली आहेत. काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते जयराम नरेश आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी मोदी यांना खलनायक ठरवणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केल्यानंतर शशी थरुर यांनीही आता मोदींचे कौतुक केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कविर्तकांना उधाण आले आहे. मोदींनी केलेल्या चांगल्या कामांचे आपण कौतुक केले पाहिजे, हे आपण आधीपासून सांगत असल्याचे थरूर यांनी स्पष्ट केले. मात्र, ज्यावेळी मोदींची चूक असेल ती आपण जनतेच्या लक्षात आणून दिली तर आपल्याला जनतेचा विश्वास संपादन करता येईल असेही ते म्हणाले.

मोदींनी चांगले काम केले तर खुल्या मनाने त्यांची प्रशंसा करायला हवी, हे मत आपण सहा वर्षांपासून व्यक्त करत आहोत. आता अन्य विरोधकही आपल्या या मताशी सहमत आहेत, याबाबत समाधान वाटते, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खलनायक ठरवणे अयोग्य असल्याचे मत ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी नुकतेच व्यक्त केले होते. त्यांच्या विधानानंतरच मोदींचे कौतुक करणारे ट्विट थरुर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान मोदी यांना खलनायक ठरवल्याने विरोधी पक्ष त्यांची मदत करत आहेत. त्यामुळे त्यांची प्रतीमा उंचावत आहे. त्यांना खलनायक ठरवल्याने काहीही साध्य होणार नाही, असे मत जयराम रमेश यांनी व्यक्त केले होते. प्रत्येक कामाचे मुल्यांकन व्यक्तीला बघून करण्यात येऊ नये, कामाची गुणवत्ता बघण्यात यावी, असे मत सिंघवी यांनी व्यक्त केले. उज्ज्वलासारख्या अनेक योजना मोदी यांनी आणल्या आहेत. त्यासाठी त्यांचे कौतुक करायला हवे, असेही सिंघवी म्हणाले आहेत. मोदी यांनी 2014 ते 2019 या काळात केलेल्या कामांचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. त्या कामांमुळेच ते मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळे मोदी मॉडेल पूर्णपणे नकारात्मक नाही, हे वास्तव आपण स्विकाराला हवे, असेही मतही त्यांनी व्यक्त केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या