मोदी सरकारची ‘चमकोगिरी’ काँग्रेसने केली उघड, 8 वर्षांत माध्यमांवर खर्च केलेल्या रकमेचा लेखाजोखाच मांडला

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील विरोधकांनी केलेल्या चर्चेला बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळातील कामाची उजळणी करताना ‘मी, मी, मीच केले’चा पाढा वाचला. तसेच वृत्तपत्रे आणि टी.व्ही. चॅनेलवर माझा चेहरा पाहून जनतेने माझ्यावर विश्वास टाकलेला नाही, तर मी माझे जीवन समर्पित केले आहे, असे विधानही त्यांनी केले. यावरून आता काँग्रेसने निशाणा साधला असून मोदी सरकारची चमकोगिरी आकड्यांसह उघड केली आहे.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून गुरुवारी एक ट्विट करण्यात आले आहेत. संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा दावा केला की, वृत्तपत्रे आणि टी.व्ही. चॅनेलवर माझा चेहरा पाहून जनतेने माझ्यावर विश्वास टाकलेला नाही. परंतु सत्य हे आहे की मोदी सरकारने 20147 ते 2022 या आठ वर्षांच्या काळात जाहिरातबाजीवर तब्बल 6500 कोटी रुपये खर्च केले, असे काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मोदी सरकारने गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत खर्च केलेल्या 6500 कोटींचा हिशोबही काँग्रेसने दिला आहे. प्रिंट मीडियावर मोदी सरकारने तब्बल 3230.77 कोटी रुपये, तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर 3260.79 कोटी रुपये खर्च केले आहेत, असे काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये देशातील प्रमुख वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोदी सरकारच्या जाहीरातीचा फोटो दिसत आहे.