कश्मीरची स्वायत्तता मागणे हा सैनिकांचा अपमान!

35

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याची मागणी करणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला. कश्मीरचे स्वातंत्र्य मागणाऱयांना पाठिंबा देताना काँग्रेसला थोडेही दु:ख होत नाही का असा सवाल करतानाच कश्मीरसाठी अधिक स्वायत्तता मागणे हा हिंदुस्थानी जवानांचा अपमान आहे अशी तोफ त्यांनी डागली. चिदंबरम यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनीही टीका केली आहे. राजकोट येथील सभेत शनिवारी चिदंबरम यांनी कश्मीरला अधिक स्वायत्तता द्यावी असे वक्तव्य केले होते. काँग्रेसला त्यांच्या वक्तव्याचे उत्तर द्यावेच लागेल असे मोदी म्हणाले.

काँग्रेसने हात झटकले
चिदंबरम यांचे कश्मीरबाबतचे वक्तव्य त्यांचे व्यक्तिगत मत आहे. काँग्रेसचा त्यांच्याशी काहाही संबंध नाही असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. पक्षाच्या या भूमिकेमुळे चिदंबरम एकटे पडल्याचे चित्र आहे. कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग होता आणि राहील असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.

कश्मीर समस्या ही काँग्रेसनेच निर्माण केलेली आहे. चिदंबरम यांचे वक्तव्य पाकिस्तान आणि फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देणारे आहे. काँग्रेसने या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे.
– अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

आपली प्रतिक्रिया द्या