इंधनावरील व्हॅट कमी करा, पंतप्रधानांचे राज्यांना आवाहन

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरीक त्रस्त आहेत. या किंमती कमी होत नसून उलट दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. रशिया युक्रेन युद्धानंतर इंधनाच्या दरांनी राज्यात उच्चांक गाठला आहे. या दरवाढीवर सामान्य नागरिकांनी आक्रोश करायला सुरुवात केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या राज्यांना इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी हे आवाहन केले आहे.

देशात काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये इंधनाच्या वाढत्या दरांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. पश्चिम बंगाल, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, झारखंड, तमिळनाडूमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्यात आला नसून या राज्यांना आपण हा कर कमी करावा अशी आपण विनंती करत असल्याचे मोदी म्हणाले आहेत. कर कमी केल्याने राज्याच्या महसुलावर त्याचा परिणाम होतो मात्र त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळतो असं मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी कर कमी केल्याला 6 महिने उलटून गेले असून आता राज्य सरकारांना वाटत असेल तर त्यांनी व्हॅट कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा असे मोदी म्हणाले.