माझी प. बंगालमध्ये सभा आहे, बघूया काय होते; मोदींचे ममतांना थेट आव्हान

सामना ऑनलाईन । मऊ। चंदौली

लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिले आहे. आज माझी प. बंगालमध्ये सभा आहे. ममतादीदी माझी सभा होऊ देतात की नाही हे बघूया अशा शब्दांत मोदी यांनी ममतादीदींना आव्हान दिले आहे. मऊ आणि चंदोली येथील प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मंगळवारच्या रोड शोदरम्यान प. बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. त्यावरून टीएमसी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी पश्चिम मेदिनीपूरमध्ये आपल्या सभेत टीएमसीने गोंधळ घातला होता. त्यानंतर ठाकूरनगरमध्येही तृणमूलच्या आमदारांचा गदारोळ वाढल्याने आपल्याला भाषण अर्ध्यावर सोडून बाजूला व्हावे लागले होते. आज डमडममध्ये आपली सभा होणार आहे. बघूया ममतादीदी ही सभा होऊ देतात का असा सवाल करत मोदी यांनी ममतादीदींना आव्हान दिले. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान ईश्वरचंद्र विद्यासागर यांची प्रतीमा तोडण्याचे काम टीएसीच्या कार्यकर्त्यांनी केले, असा आरोपही त्यांनी केला. ही प्रतीमा तोडणाऱ्यांवर आणि हिंसाचार भडकवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. आमचे सरकार ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या आर्दशानुसार काम करत असल्याचे म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसने आतापर्य़त आमच्या 70 सभा रोखल्याचे अमित शहा यांनी सांगितले.