कोरोनावरील औषध मिळेपर्यंत सतर्कता बाळगा; पंतप्रधानांचे जनतेला आवाहन

जगभरासह देशातही कोरोनाचा कहर वाढत आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रोखण्याबाबतचे नियम अनेकांकडून पाळण्यात येत नाही, तसेच काहीजणांना कोरोनाचे गांभीर्य कळत नसल्याने त्यांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला कोरोनाचे औषध किंवा लस येत नाही, तोपर्यंत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मध्य प्रदेशात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कोरोनावर लस बनवण्याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत. मात्र, कोरोनावर प्रभावी औषध किंवा लस सापडत नाही, तोपर्यंत कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकानेच काळजी घेण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यासाठी पंतप्रधानांनी एक नाराही दिला. ‘जब तक दवाई नाही, तब तक ढिलाई नही’ असे ते म्हणाले. त्याचबरोबर जनतेने मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. ‘दो गज की दूरी, मास्क है जरुरी’ असा नाराही त्यांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कबाबत दिला. जनतेने या संकटाचे गांभीर्य ओळखावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.

देशात सलग तिसऱ्या दिवशी 95 हजारपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी 97,570 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या 46 लाख 59 हजार झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत 36 लाख 24 हजारपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या