मोदींनी सांगितला पुण्याच्या रिक्षावाल्याचा भन्नाट किस्सा, समाजवाद्यांची घेतली फिरकी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या ‘अराजकीय’ मुलाखतीत पुण्यात घडलेला एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. पुण्यातले स्वत:ला समाजवादी लोक आपण कसे साधे व मेहनती आहोत हे दाखवण्यासाठी, लोकांवर इंप्रेशन पाडण्यासाठी काय करायचे याबद्दलचा एक किस्सा सांगितला.

खूप वर्षांपुर्वी एकदा नरेंद्र मोदी पुण्यातल्या आरएसएस कार्यालयात जाण्यासाठी  पुणे स्थानकातून पायी निघाले होते. त्यावेळी एक रिक्षावाला त्यांच्यामागून पाठलाग केल्यासारखा रिक्षा चालवत होता. जवळपास 100 ते 200 मिटर सोबत येत असलेल्या या रिक्षावाल्याकडे मोदींचे लक्ष गेलं. मोदींनी त्याला माझ्या पाठून काय येतोयस असं विचारलं. यावर त्या रिक्षावाल्याने त्यांना उलटा प्रश्न विचारला की ‘तुम्ही रिक्षात बसणार नाही का?’ त्यावर मोदी म्हणाले “नाही, मी तर पायीच निघालोय”. हे उत्तर ऐकल्यानंतर रिक्षावाल्याने त्यांना विचारले की तुम्ही समाजवादी आहात का? त्यावर मोदी म्हणाले “मी जनतावादी आहे”. असा प्रश्न का विचारला असं मोदींनी रिक्षावाल्याला विचारलं असता रिक्षावाला म्हणाला की  “पुण्यातले समाजवादी लोक स्टेशनबाहेर लोकांसमोर रिक्षात बसत नाहीत, ते थोडं पुढे गेल्यावर गुपचूप रिक्षात बसतात. अक्षय कुमारला यामागचं राजकारण फारसं माहिती नसल्याने त्याने मोदींना प्रश्न विचारला की असं का ? यावर मोदी म्हणाले की “समाजवादी आपण कसे साधे, मेहनती आहोत हे दाखवत लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करयाचे. ते स्टेशनवर उतरल्यानंतर लगेच रिक्षामध्ये न बसता काही अंतर गेल्यानंतर रिक्षात बसायचे.”

नरेंद्र मोदी यांनी कुर्ता पायजमा घातला होता आणि दाढीही वाढवली होती. त्यांच्या पेहरावावरूनते समाजवादी असावेत असा रिक्षावाल्याचा समज झाला होता. या समजामुळेच हा सगळा प्रकार घडल्याचं मोदींनी मुलाखतीमध्ये सांगितलं.