मुद्दा – पीएमसी बँक प्रकरण आणि बँकिंग व्यवस्था

1493

>> वैभव पाटील

पीएमसी बँकेच्या दोन खातेधारकांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला व एकाने आत्महत्या केली. ऐन निवडणूक व दिवाळीच्या धामधुमीत बँकेच्या लाखो खातेधारकांची खाती गोठवल्याने त्यांच्या संतापाचा कडेलोट झालेला आहे. महिना उलटत आला तरी आरबीआय व सरकार सर्वसामान्य लोकांचा लॉक झालेला पैसा काढण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने दिवसेंदिवस हे प्रकरण आणखीच चिघळत चाललेले आहे. आयुष्यभराची मिळकत या बँकेत अडकून पडल्याने व ती परत मिळण्याचे कोणतीही चिन्हे निर्माण होत नसल्याने खातेधारकांचे नाहक जीव जात आहेत. हे प्रकरण ईडी, सीबीआय, सर्वोच्च न्यायालायमार्फत हाताळले जात असून दररोज नवनव्या घोषणा, अटक सत्र, धाडी, पंचनामे, मालमत्ता जप्ती, आंदोलने सुरू आहेत. मात्र निवडणूक प्रचारात अडकून पडलेल्या राजकीय पक्षांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी तूर्तास तरी वेळ दिसत नाही. सामान्य नागरिकांसोबतच अनेक पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था, गुरुद्वारा यांचे पैसे या बँकेत अडकून पडल्याने यंदा त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खातेधारक प्रचंड तणावाखाली असून आरबीआय व सरकारवर दबाव वाढवण्यासाठी दररोज शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या पैसे काढण्याची मर्यादा चाळीस हजारांपर्यंत वाढविण्यात आली असली तरी मोठी गुंतवणूक केलेल्या खातेधारकांना हा दिलासा अजिबात वाटत नाही. जीवनभराची कष्टाची कमाई एका बँकेत गुंतवल्यानंतर अचानक एके दिवशी ही रक्कम काढता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याने खातेधारकांची मानसिक स्थिती काय असेल याचा विचार कुणीतरी करायला हवा. अशा प्रकारे इतक्या मोठय़ा प्रमाणावरील लोकांचा कष्टाचा पैसा आरबीआयने गोठवल्याचे बहुदा हे एकमेव उदाहरण असेल. आज बँकांमधील ठेवी सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात. मात्र पीएमसीच्या उदाहरणावरून बँकिंग क्षेत्र भविष्यात संशयाच्या भोवऱयात येऊ शकते. सर्वसामान्य, निवृत्त, वयोवृद्ध, असहाय लोकांसाठी स्वतःची आयुष्याची कमाई गुंतवण्याचा जवळचा पर्याय म्हणजे बँक, पण अंतर्गत घोटाळ्यांमुळे आरबीआय एका रात्रीत बँक खाती सील करत असेल तर लोकांनी पैसा नेमका ठेवायचा तरी कुठे यासाठीदेखील मार्गदर्शक सूचना सरकार व आरबीआयने आता द्यायला हव्यात असे वाटते. घोटाळेबाज सहकारी बँकांचे आता अधिक बारकाईने परीक्षण करून लोकांना त्वरित त्याची पूर्वकल्पना द्यावी. पीएमसी प्रकरण ही सर्व बँक खातेधारकांसाठी एक शिकवण आहे. बँकेच्या अधिकाऱयांनी व संचालकांनी आर्थिक अनियमितता केली तर खातेधारकांचा पैसा अडकवून ठेवणे म्हणजे त्यांनादेखील आरोपीच्या पिंजऱयात टाकण्यासारखे आहे. पीएमसी बँकेची गुंतागुंत सरकारने हस्तक्षेप करून लवकरात लवकर सोडवली नाही तर भविष्यात त्याचे परिणाम बँकिंग व्यवस्थेवर होतील अशी शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या