पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी माजी भाजप आमदाराच्या मुलाला अटक

703

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आज भाजपाचे माजी आमदार सरदार तारासिंग यांच्या मुलाला अटक केली. राजनित सिंग असे त्यांचे नाव असून ते बँकेचे माजी संचालक होते. या घोटाळ्यातील ही नववी अटक असून आणखी अटकेच्या कारवाया होतील असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

पीएमसी बँकेच्या संचालकाबरोबर राजनित हे बँकेच्या रिकव्हरी समितीचे बराच कालावधीसाठी सदस्यदेखील होते. पीएमसी बँकेने एचडीआयएल ग्रुप कंपनीला कर्ज दिले होते. त्यामुळे एचडीआयएलकडे थकलेल्या कर्जाची रिकव्हरी करण्यासाठी राजनित यांनी काय प्रयत्न केले याबाबत चौकशी करण्यासाठी राजनित यांना आज आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते, परंतु चौकशीत राजनित यांच्याकडून समाधानकारक व पटतील अशी उत्तरे तपास पथकाला मिळाली नाहीत. परिणामी राजनित यांचा बँक घोटाळ्यात सहभाग असल्याचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे त्यांना आज अटक करण्यात आल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. राजनित यांना उद्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या