पीएमसी बँक घोटाळ्यामुळे पैसेच नाहीत,हजारो शीख बांधव कर्तारपूर तीर्थयात्रेपासून वंचित

893

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेत (पीएमसी) झालेल्या घोटाळ्यामुळे खातेदारांचे लाखो रुपये बँकेत रखडले आहेत. पैसे काढण्यावरही मर्यादा घातली गेली आहे. त्याचा फटका राज्यातील शीख बांधवांना बसला आहे. पैशांअभावी हजारो शीख बांधव पाकिस्तानातील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब तीर्थयात्रेपासून वंचित राहिले आहेत.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि नांदेड येथील सुमारे दोन हजार शीख बांधव हे पीएमसी बँकेचे खातेदार आहेत. ते निर्माण सेवक जत्था या शिखांच्या स्थानिक संस्थेमार्फत गुरुद्वारा दरबार साहिब येथे जाण्यास इच्छुक होते. त्याची माहितीही केंद्राकडे पाठवण्यात आली होती, परंतु पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे पैशांअभावी त्यामधील बहुतांश भाविकांनी नकार कळवला. फक्त 50 भाविकांनाच कर्तारपूर तीर्थयात्रेसाठी आर्थिक व्यवस्था करता आली अशी माहिती कुर्ला येथील गुरुद्वारा समितीचे हरदेवसिंग सैनी यांनी दिली.

दोन ऑडिटर अटकेत

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या दोन ऑडिटरना आज अटक केली. जयेश धीरजलाल संघानी आणि केतन प्रवीणचंद लकडावाला अशी या दोघांची नावे आहेत. या दोघानाही मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक जयेश असोसिएटस् आणि लकडावाला कंपनी हे बँकेत ऑडिटर म्हणून काम पाहत होते. त्या काळात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जयेश आणि केतनला आज चौकशीसाठी बोलावले होते. पीएमसी बँकेतील ऑडिटर म्हणून त्यांनी पोलिसांना तपासात सहकार्य केले नाही. त्यामुळे त्या दोघांना आज सायंकाळी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाकरिता आर्थिक गुन्हे शाखेने पथक तयार केले होते. या पथकाने एचडीआयएलचे अध्यक्ष राकेश आणि सारंग वाधवानला अटक केली होती.

पीएमसी बँकेतील 80 टक्के खाती शीख बांधवांची

पीएमसी बँकेतील 80 टक्के खाती ही शीख बांधवांची आहेत. एरवी अडचणीच्या वेळी ते परस्परांची मदत करतात, परंतु पैसे काढण्यावर मर्यादा आल्याने कर्तारपूर तीर्थयात्रेसाठी इतरांची मदत करू शकलेले नाहीत असे कुर्ला गुरुद्वारा समितीचे सदस्य प्रीतपालसिंग सेठ यांनी सांगितले. सेठ यांचीही कर्तारपूरला जाण्याची संधी पैशांअभावी हुकली.

सुवर्ण मंदिर झळाळले

शिखांचे गुरू नानक यांची 550वी जयंती मंगळवारी देशभरासह जगभरात साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमृतसरमधील सुवर्णमंदिर सोमवारी रोषणाईने न्हाऊन निघाले. देशभरातून आलेले शीख भाविक गुरू ग्रंथसाहेबसमोर जाऊन नतमस्तक झाले. काहींनी गुरुद्वारामध्ये विविध सेवा बजावल्या.

आपली प्रतिक्रिया द्या