पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवणार

330

पीएमसी बँकेच्या खातेदारांना पैसे काढण्याची मर्यादा वाढवून देण्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांशी चर्चा करण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज खातेदारांना दिले. त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघून हजारो खातेदारांना दिलासा मिळणार आहे.

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर खातेदारांना पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली असल्यामुळे हजारो खातेदार चिंतेत पडले आहेत. पैशांअभावी अनेकांची महत्त्वाची कामे रखडली आहेत. रिझर्व्ह बँकेने लवकरात लवकर  पीएमसी बँकेची अन्य बँकेत विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू करावी, खातेदारांचे पैसे परत मिळावेत आणि मुदत ठेवींच्या विमा संरक्षणाची मर्यादा वाढवावी अशा खातेदारांच्या मागण्या आहेत.

बँक घोटाळे रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणार

पीएमसी बँकेतील घोटाळ्यानंतर असे घोटाळे पुन्हा घडू नयेत म्हणून कायद्यात दुरुस्ती करण्यात येईल, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बँकिंग सचिव आणि वित्त सचिवांना त्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पीएमसी बँकेतील ठेवींच्या विमा संरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात लक्ष घालण्याच्या सूचना वित्त विभागाला देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

अर्थमंत्र्यांना घेराव

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेसाठी भाजप कार्यालयात आल्याची माहिती मिळताच पीएमसी बँकेचे शेकडो खातेदार तिथे पोहोचले. त्यांनी सीतारामन यांना घेराव घालून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सीतारामन यांनी खातेदारांच्या शिष्टमंडळाला बोलवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. खातेदारांनी आपल्या वरील मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. बँकेत अडकलेले पैसे कधी परत मिळणार ते स्पष्ट करा, असा आग्रहही त्यांनी धरला.

आपली प्रतिक्रिया द्या