पीएमसी बँकेवरील निर्बंधांमुळे खातेदारांमध्ये गोंधळ,गरीब, मध्यमवर्गीयांची कोंडी होणार!!

34103

सहा महिन्यांपूर्वीच ज्या बँकेला ‘अ’ ऑडिट वर्ग दिला त्या मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी)  रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध आणले आणि लाखो ठेवीदार, खातेदारांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. बँकेच्या प्रत्येक शाखेत ग्राहकांची पैसे काढण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली. मात्र पुढील सहा महिने ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. दरम्यान, ‘अ’ दर्जा मिळवलेल्या पीएमसी बँकेत गेल्या सहा महिन्यांत असे नेमके काय घडले म्हणून निर्बंध आणावे लागले, असा सवाल आता सहकार क्षेत्रातून विचारला जात आहे. तर सहकार चळवळ मोडीत काढण्याचा तर हा डाव नाही ना, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

चिंता, आक्रोश आणि हतबलता! पैसे काढण्यासाठी पीएमसी बँकेत सभासद, ग्राहकांची गर्दी

बँकेची सद्यस्थिती पाहता ठेवीदार, कर्जदार व खातेदारांच्या हितासाठी पीएमसी बँकेवर निर्बंध आणणे गरजेचे होते असे रिझर्व्ह बँकेच्या आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार बँकेच्या व्यवहारांवर सोमवार 23 सप्टेंबरपासूनच निर्बंध घालण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जाचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

स्थापना – 13 फेब्रुवारी 1984
मुख्यालय – भांडुप
शाखा – 137
सभासद – 51601
भागभांडवल – 393 कोटी
रिझर्व्ह फंड – 934 कोटी
ठेवी सुमारे – 11618 कोटी
कर्जवाटप – 8400 कोटी
थकीत कर्ज – 311 कोटी

कर्जदार त्यांच्या ठेवींचा वापर कर्ज फेडण्यासाठी करू शकतात. मात्र अशा खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे.

हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू असतील व त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल.

सहा महिन्यांत सुरळीत होईल; धीर धरा!
पीएमसी बँकेचे प्रमुख रॉय थॉमस यांनी सर्व खातेदार, ठेवीदारांना एसएमएस पाठवून ‘आम्ही यावर मात करू’ असा विश्वास दिला आहे. आरबीआयने बँकिंग नियमन कायदा 35 अ अंतर्गत कारवाई करत सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. व्यवहारातील अनियमिततेमुळे सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बँकेचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून मी जबाबदारी स्वीकारतो आणि सर्व ठेवीदारांना हमी देतो की सहा महिन्यांच्या आत अनियमितता सुधारली जाईल, असा विश्वास जॉय यांनी व्यक्त केला आहे. तुम्हा सर्वांसाठी ही कठीण वेळ आहे आणि माफी मागून तुमच्या अडचणी कमी होणार नाहीत याची मला कल्पना आहे, पण कृपया तुम्ही आम्हाला सहकार्य करा. या कठीण परिस्थितीवर नक्कीच मात करू आणि पुन्हा खंबीरपणे उभे राहू असा विश्वास आहे, असेही जॉय यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या