आरबीआय चोर है! खातेधारकांची हायकोर्टाच्या आवारात घोषणाबाजी

272

पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी खातेदारांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. खात्यातून किती पैसे काढायचे याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही असे स्पष्ट करत आजारपण, लग्नकार्य किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास आरबीआयकडे त्यांनी अर्ज करावा, अशा सूचना न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने खातेदारांना दिल्या. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संतापलेल्या बँक खातेधारकांनी  ‘आरबीआय चोर है’ म्हणत हायकोर्टाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली.

खातेधारकांच्या घोषणाबाजीमुळे तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांसोबतही खातेधारकांची बाचाबाची झाली. त्यानंतर निदर्शने करणाऱ्या पीएमसीच्या ग्राहकांना पोलिसांनी कोर्टाच्या आवारातून हुसकावून लावले. आर्थिक घोटाळय़ामुळे आरबीआयने पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर (पीएमसी) निर्बंध घातले असल्यामुळे खातेदारांना आपल्या खात्यातून हवी तेवढी रक्कम काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. याशिवाय पीएनबी बँकेच्या घोटाळय़ामुळे आतापर्यंत चार खातेदारांचा मृत्यूही झाला आहे. आरबीआयने पीएनबी बँकेवर घातलेले निर्बंध हटवावेत तसेच ग्राहकांना आपल्या खात्यातून जास्तीत जास्त रक्कम काढण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी करत शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्यासह इतर काही जणांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सुनावणीप्रसंगी आरबीआयच्या वतीने ऍड. व्यंकटेश धोंड यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले व कोर्टाला माहिती दिली की, आरबीआयच्या वतीने प्रशासक नेमण्यात आला आहे. ग्राहकांना फक्त 50 हजारांपर्यंत पैसे काढण्याची मुभा आहे. त्यापेक्षा जास्त पैसे काढावयाचे असल्यास ग्राहकांनी आरबीआयकडे अर्ज करावा. पैसे काढण्यावर घालण्यात आलेली बंदी ही पीएमसी बँकेकरिता आवश्यक आहे. खंडपीठाने हे प्रतिज्ञापत्र दाखल करून घेत सुनावणी 4 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

एक लाखाची रक्कम काढायची असल्यास आरबीआयकडे अर्ज करा

ग्राहकांना 1 लाखापर्यंत पैसे काढण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु , 1 लाख किवा त्याहून अधिक रक्कम काढायची असल्यास आरबीआयकडे अर्ज करण्याच्या सूचना न्यायमूर्तींनी दिल्या. त्यामुळे पीएमसीच्या खातेधारकांचा पुरता हिरमोड झाला.  न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यामुळे खातेधारकांचा संताप अनावर झाला.  लग्नकार्ये, आजारपण किवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत पैसे आणायचे कुठून, असा सवाल यावेळी खातेदार करताना दिसत होते.

आपली प्रतिक्रिया द्या