१५ घरे,१७ कार्यालयांसह मेहुल चोक्सीची १२१७ कोटींची संपत्ती जप्त

सामना ऑनलाईन, मुंबई

पीएनबी बँकेत ९ हजार कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा करणाऱ्या आरोपींपैकी एक मेहुल चोक्सी याची १२१७ कोटींची संपत्ती अंमलबजावणी संचलनालयाने जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये चोक्सीच्या १५ घरांचा आणि १७ कार्यालयांचाही समावेश आहे. चोक्सीचा कोलकाता इथला शॉपिंग मॉल, अलिबागमधलं फार्म हाऊसही जप्त करण्यात आलं आहे. नाशिक, नागपूर, पनवेल, विल्लुपूरम आणि आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यातील जमिनी आणि त्यावरील उद्योगांवरही जप्ती आणण्यात आली आहे.

रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये चोक्सीने १७० एकर जमिनीवर हार्डवेअर पार्क उभं केलं होतं, या पार्कचीच किंमत ५०० कोटी असल्याचा अंदाज आहे. मेहूल चोक्सी हा नीरव मोदी याचा मामा असून तो देखील पीएनबी बँकेला चुना लावण्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. या दोघांविरोधातही आयकर विभागाच्या विनंतीवरून रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती ११,३६० कोटींपेक्षा जास्त असल्याचा पीएनबी बँकेने दावा केला आहे. नीरव मोदीने या बँकेला पत्र लिहून हे आकडे खोटे असल्याचं सांगत कर्जाची रक्कम ही फार कमी आहे असं म्हटलं होतं. बँकेने हे प्रकरण लोकांसमोर आणल्याने आपल्या व्यवहारावर परिणाम झाला असून आता कर्जपरत करण्याचे सगळे रस्ते बंद झाल्याची धमकीही मोदीने दिली आहे. त्यामुळे ही रक्कम त्याच्या आणि इतर आरोपींची संपत्ती जप्त करून त्याचा लिलाव करून वसूल करण्याचे प्रयत्न सुरू आहे.