पीएनबी महाघोटाळा : पंतप्रधान मोदींनी सोडले मौन

41
modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) ११ हजार ४०० कोटींच्या महाघोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले मौन सोडले आहे. आर्थिक क्षेत्रातल्या अनियमिततेवर सरकार कठोर कारवाई करत आहे आणि यापुढे करत राहील असे पंतप्रधांनी सांगितले. एका आर्थिक इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. अर्थात यावेळी त्यांनी पीएनबी घोटाळ्याचा उल्लेख केला नाही, पण त्यांचे हे वक्तव्य पीएनबी घोटाळ्याबाबतच होते, हे स्पष्ट आहे.

आर्थिक अनियमिततेबाबत हे सरकार अत्यंत कठोर आहे. या अनियमिततेच्या आड कुणी जनतेचा पैसा हडप करणार असेल तर हे सरकार अजिबात सहन करणार नाही, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

आरबीआयलाही दिला सल्ला

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशातील बँकिंग व्यवहाराचे नियमन करणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय)ला ही नाव न घेता सल्ला दिला. ज्या आर्थिक संस्थांना याबाबत नियम बनवण्याची आणि देखभाल करण्याची जबाबदारी दिली आहे, त्यांनी ही जबाबदारी पाळली पाहिजे, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.

यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पीएनबी घोटाळ्याचे खापर बँकेचे ऑडिटर्स आणि व्यवस्थापनावर फोडले होते. तसेच रिझर्व्ह बँकेलाही नाव न घेता सल्ला दिला होता.

वाचा : पीएनबी महाघोटाळ्याबाबत काय म्हणाले होते जेटली ?

आपली प्रतिक्रिया द्या