अवघ्या 6 महिन्यांची असताना दत्तक घेतलेल्या मुलीवर बापाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिने ही घटना तिच्या आईला सांगितली. आईने ताबडतोब पोलिसांत धाव घेतली आणि बापाविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.

पीडितेचे वय 16 वर्ष असून जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती आणि तिला दत्तक घेणारा बाप दोघेच जण घरी होती. मुलीची आई आणि भाऊ हे दोघेही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा उचलत बापाने तिच्यावर बलात्कार केला. बिहारमधल्या पाटणा जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे. या पीडितेने जेव्हा बापाला विरोध केला तेव्हा त्याने तू दत्तक मुलगी आहेस, सख्खी मुलगी नाही असं म्हणत तिच्यावर बलात्कार केला.

देशभरात विनयभंग आणि बलात्काराचे गुन्हे सर्रास घडत असल्याचे विदारक चित्र आहे. या गुह्यांचे बळी ठरणारे पीडित आरोपींविरोधात तक्रार करण्यासाठी बिनधास्त पुढे येत असल्याने हे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गंभीर म्हणजे अल्पवयीन मुले शारीरिक शोषणाची सर्वाधिक बळी ठरत असून ओळखीच्यांकडूनच त्यांना लक्ष्य केले जात आहे.

मुंबईचे उदाहरण द्यायचे झाले तर नुकताच प्रजा फाऊंडेशनने मुंबई शहरातील गुन्हे, अपघात, त्यांचे प्रमाण, दाखल गुन्हे, झालेल्या कारवाया, कोर्टाकडून झालेली शिक्षा आदीबाबतचा वर्ष 2018 सालातला अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार शहरात विनयभंग आणि बलात्काराच्या गुह्यांत वाढ होत असल्याचे आकडेवारी सांगते. 2018 सालात या प्रकारचे गुन्हे वाढले असताना त्यातील 69 टक्के गुह्यांत अल्पवयीन मुलांना लक्ष्य केल्याचे भयानक वास्तव आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ‘पोक्सो’चे गुन्हे पोलीस दफ्तरी दाखल होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. ओळखीच्या लोकांनीच हे गंभीर कृत्य केल्याचे फाऊंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या