पार्कातल्या कविता

<<   साहित्य कट्टा  >>         << विजय उतेकर >>

 अवचित उतरण लागावी वाटेला

आणि वाट गावात शिरावी

समोर दोन पावलांवर घर यावं

आणि घरात तू दिसावीस

तू आहेस म्हटल्यावर

मला माझी ओळख पटावी

आणि ते घर आपलं वाटावं

कविता म्हणजे

असंच काहीसं

चंद्रशेखर गोखले

एखादा रविवार, दुपारी जेवणानंतरची वेळ, अन् तरीही तुम्ही एखाद्या पार्कात, उतरत्या उन्हाच्या अन् पसरत्या सावलीच्या पाठशिवणीच्या खेळात, अवतीभवती हिरवागार निसर्ग अन् समोर दहा कवी, कवितेच्या फौजफाटय़ासह. तुम्ही भिडायला उत्सुक, बसायला खुर्ची नाही, हॉल नाही, एसी नाही, शांतताही नाही. झाडांकडे घरटय़ात परतणाऱया पक्ष्यांचा अन् आसपास खेळणाऱया मुलांचा किलबिलाट हे सगळं आहेच. अशातच एक कवी आपली कविता वाचतो अन् तुम्ही फक्त त्यातच रमता. तो शब्दांमधून सूर पेरत जातो अन् तुमच्या उरात त्याच्या संवेदनांचं गाणं उमटत राहतं. त्याची धुंदी उतरते न उतरते इतक्यात दुसरा कवी त्याची कविता सादर करतो. तोदेखील तितक्याच आर्ततेने तुमच्या रसिकतेला साद घालतो अन् तुम्ही आपल्या मनाचा हात सहज त्याच्या हातात देता अन् तो त्या पार्कात बसूनच शेकडो लोक सभोवती असताना फक्त तुमच्याशीच काहीतरी हितगुज करतो. हे भिडणं उत्तरोत्तर रंगतच जातं. खरंय, कुठली कविता कुणाला कशी भेटेल हे ती अनुभवण्याआधी सांगता येणं अशक्यप्राय आहे आणि या भेटीचा हा असा सर्वात अनौपचारिक अनुभव म्हणजे ‘पार्कातल्या कविता’ हा कार्यक्रम.

कवितेची जी काही बलस्थानं आहेत, त्यातलं मला सर्वात भावलेलं बलस्थान म्हणजे कविता ही उलगडत जाते. तिचा हा प्रवास अनुभवण्यासाठी रसिक श्रोतादेखील तितकाच उत्सुक आणि तत्पर हवा. काही कविसंमेलने आणि मुशायरे पाहून प्लास्टिकची फुले अन् लाकडी फळे वाटय़ाला आल्यासारखे वाटले तसेच अस्सल कवितेला भेटण्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं हे मनात रुजलं. त्याच दरम्यान स्नेही प्रो. संजय शिंदे यांची संकल्पना असलेला ’मुक्काम पोस्ट कविता’ हा एक दर्जेदार कार्यक्रम पाहण्यात आला. आपल्याला नक्की काय करायचंय हे मला आणि स्वरूपा सामंत यांना या कार्यक्रमानंतरच जाणवलं. पुढे आमच्या गप्पांमधून ’पार्कातल्या कविता’ची रूपरेषा घडत गेली. आम्हाला सर्वात आधी हे जाणवलं की कवितेला भेटण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ती कवितेची मोबिलिटी वाढवणं. चार भिंतीत तिला अनुभवण्यासोबतच अनेक ठिकाणी तिची भेट घडवून आणणं गरजेचं आहे. याआधी पण काही मोजकेच स्नेही कुणा एकाच्या घरी भेटून आपलं नवीन लिहिलेलं एकमेकांना वाचून दाखवत होते नि काही प्रमाणात आजही हे घडतं; पण त्याला कुणीही अशा कार्यक्रम स्वरूपात पुढे आणलं नव्हतं.

कवितेच्या मोबिलिटीसाठी आम्ही पार्क म्हणजेच उद्यान हा समान धागा ठेवला कारण एकतर निसर्गाचा थेट सहवास आणि दुसरं म्हणजे पार्क कुठल्याही लहान-मोठय़ा शहरात, उपनगरात नि गावात सहज उपलब्ध असतात. रसिक श्रोत्यांसाठी दहा कवी अन् त्यांच्या प्रत्येकी दोन अशा वीस कवितांचं सादरीकरण करायचं ठरलं. प्रत्येक प्रयोगाला पार्क आणि कवी नवे असतील अशी मूळ रूपरेषा ठरली अन् आकाराला आला ‘पार्कातल्या कविता’ हा एक बॅनरलेस तसेच विनामूल्य प्रवेशाचा कार्यक्रम जिथे स्टेजही नसेल अन माईकही. कवी, श्रोता, निसर्ग आणि कविता या साऱयांना एकाच प्रतलात आणणारा कार्यक्रम.

मुळातच कविता त्या कवीच्या आवाजात ऐकणं हा समृद्ध करणारा अनुभव असतो. खरंतर अस्सल कविता ती जी अर्थ उमगण्याआधीच आपल्या आत खोलवर झिरपत जाते. इथे म्हणूनच अनेक मुशायरे गाजवलेल्या गझलकार सुधीर मुळीकच्या कवितेची लोक आतुरतेने वाट पाहतात, तर सर्वार्थाने ज्येष्ठ अशा कवी श्रीधर जहागीरदार यांच्या कवितेसकट सादरीकरणात हरवून जातात. काही कवी तर स्वतंत्र दोन तासाचा कार्यक्रम करू शकतील अशा क्षमतेचे असूनही त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाला चार चाँद लावले आहेत. या कार्यक्रमात आम्ही भाषेचं बंधन न ठेवता मराठी, हिंदी, इंग्रजी कुठल्याही भाषेतील कविता स्वागतार्ह आहे असे ठरवले. यात खरेतर आम्हाला मराठी भाषेचं सौंदर्य वाढवणाऱया विविध बोलीभाषेतील कवितांची देखील प्रतीक्षा आहे. पुढे त्याही कविता सादर होतील अशी अपेक्षा. भाषा, बोलीचं बंधन झुगारताना आम्ही स्थळांचंही बंधन झुगारलं. पहिल्या प्रयोगात नऊ उपस्थित कवींसोबतच नागपूरच्या गायत्री मुळे तर दुसऱया प्रयोगात सांगलीच्या निर्मिती कोलते यांच्या कविता त्यांच्याच आवाजात ऑडिओ स्वरूपात ऐकवण्यात आल्या. हा अभिनव प्रयोग खूपच यशस्वी ठरला. आपल्याला कवितेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. अनेक कवींनी आपल्या काव्यसाधनेने तो आपल्यापर्यंत पोहोचता केला आहे. त्यांना अभिवादन म्हणून कार्यक्रमात एका नामांकित श्रेष्ठ कवीच्या कारकीर्दीबद्दल बोलून किमान दोन कविता वाचण्याचा शिरस्ता ठेवला आहे. पहिल्या प्रयोगात आरती प्रभू, तर दुसऱया प्रयोगात कवयित्री इंदिरा संत यांच्या दोन दोन रचना ऐकवण्यात आल्या आणि कार्यक्रमाचा शेवट वेगळ्याच उंचीवर गेला.

पहिला प्रयोग ११ डिसेंबर २०१६ रोजी मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पार पडला. याचे सूत्रसंचालन कवी/गझलकार सदानंद बेंद्रे यांनी केलं. तिथला अनुभव मंत्रमुग्ध करणारा होता व प्रतिक्रिया भारावून टाकणाऱया. कुठलीही जाहिरात न करता केवळ फेसबुक पोस्टवर नेमके रसिक श्रोते तिथे पोहोचले होते. दुसरा प्रयोग ८ जानेवारी २०१७ रोजी गोरेगावच्या आरे भास्कर उद्यानात पार पडला अन् तितकाच भारावून टाकणारा प्रतिसाद मिळाला. रसिकांच्या संख्येतदेखील लक्षणीय वाढ झाली. खरेतर पार्कातल्या कविता हा एक धागा आहे. कवी, कविता हा निसर्ग हे जडजवाहीर आहेत. या धाग्यात ओवली जात आहेत अन् ते जे आकारास येईल ते रसिक श्रोत्यांना अर्पण होणार आहे.

आयोजनाच्या दृष्टीने दर्जेदार कवींच्या तारखा मिळवणं, उद्यान व्यवस्थापकांकडून रीतसर परवानग्या मिळवणं नि समन्वय साधणं हे कळीचे मुद्दे ठरले. आता तिसऱया प्रयोगासाठी कुठलंतरी निसर्गरम्य पार्क, तिथले वृक्ष, पक्षी सारेच साद देत आहेत. भेटू लवकरच ‘पार्कातल्या कविता’मध्ये.

utsav@saamana.com