केवळ शिवसेनाप्रमुखांमुळेच…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मार्मिक’ विचारांनी वयाच्या 18-20व्या वर्षी मी भारावलो. ‘मराठी तरुणांना खासगी कंपनीत नोकरी करण्याची संधी मिळालीच पाहिजे, हा त्यांचा स्थानीय अधिकार आहे आणि त्या खासगी कंपनीचे व्यवस्थापन त्यांचा अधिकार जर त्यांना प्राप्त करून देत नसतील तर याद राखा. पुढे कंपनीचे जे काही होईल त्याची जबाबदारी त्यांचीच असेल. आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय घेऊ, याद राखा!’ हा सज्जड दम बाळासाहेबांनी दिल्यामुळेच मला वयाच्या 18व्या वर्षीच (डिसेंबर 1969) महिंद्र ऍण्ड महिंद्र कंपनीच्या इंटरनॅशनल ट्रक्टर शाखेत कांदिवली (पूर्व), मुंबईत नोकरी मिळाली आणि तीही कायमस्वरूपाची! एकदा ‘मार्मिक’च्या एका अंकात, विशेषांकासाठी साहित्य पाठवा म्हणून जाहिरात वाचली. साल होते सप्टेंबर 1972.

मी माझी स्वरचित कविता पोस्टाने पाठवली. कवितेचे शीर्षक होते ‘आदरांजली’. आणि काय आश्चर्य माझी कविता मार्मिक विशेषांकात प्रसिद्ध झाली.

ज्या शूरांनी स्वातंत्र्याचा

सूर्य आम्हाला दाखविला।

जय विश्वेश्वर देवो शांती

त्या त्या अमोल आत्म्याला।।

मी न चुकता ‘मार्मिक’च्या दादर पत्त्यावर कधी पोस्टाने, कधी स्वतः कार्यालयीन पत्त्यावर जाऊन देऊ लागलो. सोमवार, मंगळवारी हे मी दिलेले साहित्य शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकात प्रसिद्ध होऊ लागले. कधी कधी शिवसेनेच्या शाखाप्रमुखांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कामाची दखल मी ‘अंधारातले तारे’ असे नाव देऊन प्रसिद्ध होऊ लागले आणि मग एक दिवस शिवसेनाप्रमुखांचा गिरगावचा माझा मित्र हेमंत सावंत हा तेथील शाखाप्रमुख होता. तो आमच्याच कंपनीत गिअरशॉपमध्ये इन्स्पेक्टर होता. दुसऱ्या दिवशी दुपारच्या शिफ्टमध्ये आमची नेहमीप्रमाणे भेट झाली आणि म्हणाला, ‘‘तुला साहेबांनी भेटायला बोलावले आहे!’’

माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. ठरल्याप्रमाणे मी आणि हेमंत सावंत ‘मातोश्री’वर पोहोचले.

आमच्या अगोदर साबीर शेख हॉलमध्ये बसलेले होते. बाळासाहेबांच्या आणि त्यांच्या गप्पा रंगात आलेल्या होत्या. साहेबांपासून मी दहा फुटांवर उभा होतो. हेमंत सावंत साहेबांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, ‘‘साहेब, तो पहा तुमच्यासमोर उभा आहे खंडू अढांगळे!’’ माझ्याकडे पाहत साहेब घनगर्द आवाजात गरजले, ‘‘कोण हा खंडू अढांगळे?’’ मी हात जोडून म्हणालो, ‘‘हो मीच खंडू अढांगळे!’’ साहेब हसून म्हणाले, ‘‘अरे मला वाटले, अढांगळे हा कुणीतरी 50-60 वर्षांचा म्हातारा असेल.’’ (त्या वेळी माझे वय होते 21 वर्षांचे). मी पुढे सरसावलो, त्यांच्या पदकमलांना स्पर्श केला. माझ्या मस्तकावर हात ठेवून साहेब म्हणाले, ‘‘छान लिहितोस, पाठवत जा!’’ मी ‘मार्मिक’मधील प्रसिद्ध झालेल्या कवितांचे कात्रण त्यांना दाखवले. त्यांनी काळजीपूर्वक पाहिले.

मग मी सुरूच झालो. विविध विषयांवर स्फूट लेखन, विनोदी कविता पाठवू लागलो. मला कवी, लेखक, पत्रकार म्हणून मान्यता मिळत गेली आणि सर्व महाराष्ट्रातील दैनिके, मासिकांत माझ्या कथा, कविता, स्फूट लेखन प्रसिद्ध होऊ लागले आणि मी परिचित झालो ते केवळ आणि केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे.

  • खंडू अढांगळे
आपली प्रतिक्रिया द्या