मला गवसलेली कविता शब्द… सूर…श्वास आहे!

532

>> अशोक समेळ

कवी अशोक बागवे. काव्य आणि स्वर त्यांचे सहचर आहेत… त्यांचे काव्य स्वरसाज लेवूनच अवतरते…

गोष्ट आहे 2007 सालची. नाटय़संपदेसाठी, प्रभाकर पणशीकरांसाठी मी एक संगीत नाटक करत होतो. त्याचं नाव ‘अवघा रंग एकची झाला.’ नाटकात गाण्याच्या जागा कुठे असतील त्याचा पूर्ण आराखडा माझ्या डोक्यात तयार होता. फक्त ती गाणी किंवा कविता कुणाकडून लिहून घ्यायच्या यावर आम्हा दोघांची चर्चा चालू होती. पंतानी (पणशीकरांनी) एक नाव घेतलं, ते कविवर्य अशोक बागवेंचं. अशोक माझा मित्र होता. उत्तम कवी होता. पण त्याच्या कवितेला गवसण्याइतका मी परिपक्व नव्हतो. तो नाटककारही होता. त्याचं जी. व्ही. कुळकर्णी यांच्या कथेवरचं ‘राधी’ हे नाटक मी पाहिलं होतं. शब्दांचं उपजत लेणं लाभलेला अशोक बागवे याला मी आणि पंतांनी बोलावलं. हा प्राध्यापक माणूस अत्यंत साधा. शब्दा-शब्दाला हास्याचा फुलोरा फुलवणारा अवलिया. आम्ही त्याला ‘अवघा रंग’ची गोष्ट सांगितली आणि दुसऱया दिवशी मी त्याला नाटक वाचून दाखवलं. मला गाणं काय अभिप्रेत आहे ते पण सिच्युएशनल सांगितलं. त्या नाटकाला हिंदुस्थानी बाज आणि परदेशी पॉपही मला काय अभिप्रेत आहे ते सांगितलं. आम्ही एकाच गावचे ठाण्याचे. त्यामुळे आठ दिवसांत अशोक सर्व गाणी घेऊन आला. ती आम्ही दोघांनी फायनल करून पंत-पणशीकरांना दाखवली. त्यांनाही आवडली आणि जेव्हा ते नाटक रंगमंचावर आलं तेव्हा त्या संगीत ‘अवघा रंग नाटका’ची भट्टी अशी सुंदर जमली की ते नाटक सर्वार्थानं गाजलं! मग माझा एकमेव कवी फक्त अशोक बागवे. मग ती कविता नाटकातली असो, मालिकेतलं शीर्षक असो… ते फक्त आजपर्यंत प्रा. अशोक बागवेंनी लिहिलं आहे!

एकदा एका मालिकेची त्यांना मी वनलाइन सांगितली -या माणसाने तिथेच कविता केली. मालिकेचं नाव होतं- ‘…आणि अचानक’ बागवेंनी लगेच बोलायला सुरुवात केली…
निघता निघता वाट सुखाची,
का घेते हे वळण भयानक,
…आणि अचानक ।।
भूतकाळाच्या इथे सावल्या। चहूबाजूंनी घेरत आल्या।
ना समजले, ना उमजले,
…आणि अचानक।।
शब्द, ताल, घाट… कवितेला सर्वार्थानं जी विशेषणं आहेत ती या माणसाकडे ठासून भरलेली आहेत.

तसंच जेव्हा स्वामी विवेकानंदांवर, प्रदीप ढवळ यांच्या कादंबरीवरून मी नाटक लिहायला घेतलं त्यात विवेकानंद हे रवींद्रनाथ टागोर यांच्या पित्याकडे गाणं शिकायला जात असा उल्लेख आहे. तेव्हा मला तिथे काव्यमय गीत हवे होते आणि नाटकासाठी नावही सुचत नव्हतं. अशोक बागवेंनी पटकन सांगितलं, ‘अरे नाटकाचं नाव ठेव ‘संन्यस्त ज्वालामुखी’ आणि विवेकानंदांच्या तोंडात रवींद्र संगीताने जाणाऱया काव्यपंक्ती अशा असतील…

नामावाचून काही नाही,
एक नाम उद्धारी, उद्धारी,
ब्रह्मही तूचि, जगतही तूचि
तेजोमय अविकारी,
नामावाचून काही नाही।।
निर्गुण निराकार परमेश्वराचं रूप अगदी सहज बागवेंनी चितारलं…

भज मातादि तत्त्व अनादी। केवल तनमन हारी।
वारी वारी खल दुःख हारी।
सुजनात्मा भवतासि।
नामावाचून काही नाही…।।

तेच विवेकानंद एका गणिकेचं गायन जयपूरच्या खेत्री महाराजांच्या दरबारात ऐकतात… तेव्हा त्या गणिकेच्या तोंडातून बागवे म्हणतात –

समदर्शी हे नाम तुझे रे।
रामही तूचि। रहिमही तूचि।
एकच रुधिर हृदयी वाहे। समदर्शी हे नाम तुझे रे
माझे अवगुण चित्त न धरी। सच्चिदानंद कृपाळू आहे
समदर्शी हे नाम तुझे रे।।

या तरुण गणिकेला विवेकानंद ‘माते’ नावानं पुकारतात…

आशय, विषय कुठलाही असो, हा विलक्षण सर्जनशील माणूस संपूर्ण विषयाचा आवाका आपल्या चार ओळींच्या कवितेत मांडतो.2017-2018 मध्ये मी आणखीन एक संगीत नाटक केलं. त्याचं नाव ‘संगीत शंकरा’. पूर्वी राजे-महाराजांची जशी घराणी होती तशी गायकांचीही घराणेशाही होती. अशाच एका भेंडीबाजार घराण्यातल्या गुरूने आपल्या लाडक्या शिष्याला- शिवप्रसादला आपल्या मुलीच्या- बानूच्या खोटय़ा तक्रारीवरून हाकललाय. बानूचं त्याच्यावर प्रेम असतं, पण तिला तो गुरुभगिनी मानत असतो आणि त्यामुळे त्याला वणवण करत फिरावं लागतं. आपल्या गुरूचं गाणं शिवप्रसादला पुढे पोचवायचं असतं. त्याचे गुरुजी अल्लाला प्यारे होतात… तेव्हा त्याचं घराणं टिकावं म्हणून शिवप्रसाद गावोगावी, शहरोशहरी वणवण करत असतो.. त्याचा आत्मा आहे सूर… सूर… फक्त सूर.

सूर गगन श्वास आहे।
सूर गहन ध्यास आहे।।
सूर सहनिवास कधी।
सूर विजनवास आहे।।
सूर चांदण्यात ओला।
सूर पाणलोट झाला।।
सूर वादळात अनल… प्रलभ – पदन्यास आहे।
सूर गगनश्वास आहे।।
सूर स्पर्श… सूर गंध,
सूर तरल आसमंत धुंद,
सूर तृषा सुरांची… सूर मुकूल आस आहे…।।
सूर जीव प्राण माझे,
सूर चैत्यभान माझे
सूर रागिणीत नवल, अजरामर भास आहे।।
सूर गगनश्वास आहे, सूर गगनश्वास आहे।।

सूर, ताल, काव्य, कविता त्यातली गेयता, निर्मलता… हे परमेश्वराचे पंचमवेदाचे स्मरण बागवे सहज करून देतात.अशा शिवप्रसादला त्याला हवा तसा शिष्य आणि हवा तसा आवाज एका रस्त्यावर डबडं वाजवत गाणाऱया पोराकडून मिळतो… या गाण्याचा बाज आणि भक्तिरसात बुडालेलं काव्य पहा…

विठू माझी माऊली गा… विठू माझी माऊली।
चंदनाची साऊली गा… विठू माझी माऊली।।
घुनू घुनू वाजं घुमडु, टुनू टुनू नाचं झुमक।
चांदनीचं घुंगरू ढगाच्या डफाला।
इट्टल घावला रं माझा, इट्टल धावला…।।

शिवप्रसादला शोधत पश्चातापदग्ध त्याची बानू येते… शिवप्रसाद तिला स्वीकारत नाही… पण गुरुभगिनी हे नातं कायम आहे. बानू मात्र आजही त्यांच्यावर प्रेम करते आणि जुन्या आठवणीचा राग मारवा, जो त्यांनी तिला अर्धवट शिकवलाय तो पूर्ण करायला सांगते. आणि शिवप्रसाद… बागवेच्या लेखणीतून, त्यांच्या प्रतिभेतून उतरलेल्या काही अप्रतिम शब्दांचे फवारे अगदी हळुवारपणे मांडतात…

सुन्न गगन मंडलात
भिरभिरतो एक सूर… दूर… दूर..।
सावल्या विसावल्या, झाडपान हे मुके
अंधुकसे स्मरण तसे काळजातले धुके। दूर दूर ।।

आता प्रा. अशोक बागवेंचा मला गवसलेला वेदनेचा, प्रतिभेचा सूर आवरताना शेवटी एवढंच म्हणतो-
वेदनेला आवरावे लागते,
अन् सुखाला बावरावे लागते।।
जखम ओली का जळावी।
सोसताना आर्त ओवी।
मौन तेव्हा पांघरावे लागते।
अन् सुखाला सावरावे लागते।।
कोवळा काळोख होतो,
ऐनवेळी तोल जातो
तोल जाता भोवरावे लागते
का सुखाला बावरावे लागते।।

कवितेचा हा अप्रतिम नजराणा, कवितेच्या सर्वांगाचा तोल सांभाळणारा आणि प्रत्येकाला आयुष्यात सावध करणारा याचा गर्भार्थ… आपल्या या कवितेतून प्रा. बागवे अंतर्मुख करतात.पुन्हा अशाच गवसलेल्या माझ्या कविता तुमच्या करण्यासाठी घेऊन येईन.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या