जगातील सर्वात विषारी झाड, झाडाला बांधून ठेवल्यास माणसाचा होतो तडफडून मृत्यू

मानवाला निसर्गाचा अंदाज अजूनही बांधता आलेला नाही, तो पूर्णपणे त्याला बांधता येणं ही अशक्य बाब आहे. एकीकडे निसर्गात जीवसृष्टी निर्माण झाली तर दुसरीकडे जीवांच्या संहाराचीही रचना करून ठेवली आहे. मनुष्य प्रगल्भ होत गेला आणि सगळ्या सजीवांमध्ये शक्तिशाली बनला, मात्र या मानवासाठीही निसर्गाने अशा गोष्टी निर्माण करून ठेवल्या आहेत ज्यामुळे त्याचा जीव जाऊ शकतो. 1999 साली एका विषारी झाडाचा मनुष्याला नव्याने शोध लागला. हे झाड इतकं विषारी आहे की जर पाऊस पडत असताना तुम्ही त्याच्या खाली उभे असाल आणि झाडावरून ओघळणारे पाणी तुमच्या अंगावर पडले तर तुमचा जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषारी झाडाची ओळख महिला क्ष-किरणतज्ज्ञ आणि तिच्या मैत्रिणीमुळे आधुनिक जगाला झाली.

निकोला स्ट्रीकलँड आणि त्यांची मैत्रिण या कॅरेबिएन बेटांच्या सहलीवर गेल्या होत्या. टोबॅगो बेटावर समुद्राचा आनंद लुटत असताना त्यांना मऊशार वाळूतील शंख,शिंपले गोळा करण्याचा मोह आवरला नाही. ज्यामुळे त्यांनी ते वेचायला सुरुवात केली. यावेळी त्यांना नारळ आणि आंब्यांच्या सड्यामध्ये लहान सफरचंदासारखं एक गोड वासाचं फळ दिसलं. उत्सुकता म्हणून ते त्यांनी घेतलं आणि त्याचा लचका तोडला. काही सेकंदामध्ये निकोला आणि त्यांच्या मैत्रिणींना अस्वस्थ वाटायला लागलं, दोघींचाही घसा जळजळायला लागला, मिरच्या झोंबल्यानंतर जश्या वेदना होतात तश्या वेदना व्हायला लागल्या. घशामध्ये सुया टोचत असल्यासारखं वाटायला लागलं आणि काहीही गिळता येईनासं झालं. त्यांच्या घशाला भयंकर सूज आली होती. सुदैवाने या दोघींना उपचार मिळाले आणि त्या बऱ्यादेखील झाल्या. मात्र तत्काळ उपचार मिळाले नसते तर कदाचित त्यांचा मृत्यू झाला असता.

निकोला आणि त्यांच्या मैत्रिणीने जी फळे खाल्ली होती त्यांना विषारी पेरू किंवा समुद्री सफरचंदे असं अमेरिकेच्या काही भागात तसेच कॅरेबिअन बेटांवर म्हटलं जातं. ही फलं मॅंचिनेल झाडाची फळे आहेत. ही फळे अख्खी खाल्ली आणि ती पोटात गेली तर तत्काळ उलट्या आणि अतिसाराला सुरुवात होते. शरिरातील पाण्याची पातळी कमी होते आणि त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. सुदैवाने निकोला आणि त्यांच्या मैत्रिणीने फळाचा छोटासा तुकडा खाल्ला होता. 2000 साली त्यांनी लिहिलेले एक पत्र ब्रिटीश मेडीकल जर्नलने प्रसिद्ध केले होते. यात त्यांनी फळ खाल्लानंतरचा अनुभव लिहिला होता. 8 तास आम्ही भयंकर वेदना सहन केल्या असं त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

या झाडी फळं जितकी विषारी आहेत तितकंच हे झाडंही विषारी असल्याचं नंतर संशोधनातून कळालं. या झाडाला स्पॅनिश भाषेमध्ये आर्बोल दे ला म्युएर्ते ( arbol de la muerte ) म्हटलं जातं. याचा अर्थ मृत्यूचे झाड असा होतो. या झाडाचा मुळापासून फळापर्यंत प्रत्येक भाग हा अत्यंत विषारी आहे. या झाडाची  गोड वासाची, पेरूसारखी दिसणारी ह्या झाडाची फळे माणसाचा जीव घेऊ शकतात.   ह्याच्या पानांना स्पर्श केल्याने अंगावर चट्टे आणि डास चावल्यावर जसे फोड येतात तसे फोड येऊन भयंकर वेदना सहन कराव्या लागतात.

पावसात ह्या झाडाखाली निवाऱ्यासाठी उभे राहिल्यास आणि झाडावरून ओघळणारे पाणी अंगावर पडल्यास त्वचा जळजळायला सुरुवात होते. झाडाच्या फांद्या जाळल्या आणि त्याचा धूर तुमच्या डोळ्यात गेला तर तो तुम्हाला काहीकाळ अंधत्व देऊ शकतो. हे झाड विषारी असल्याने त्याच्या भोवती कॅरेबिअन बेटांवर धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत.  गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या झाडाची नोंद जगातील सर्वात विषारी झाड अशी करण्यात आली आहे.

प्राचीन काळातील माणसांना या झाडाच्या विषारी गुणधर्मांबद्दल माहिती होते असं सांगितलं जातं. ती या झाडातून निघणाऱ्या चिकामध्ये बाण बुडवून शत्रूंवर चालवायचे. हा चीक पाण्यात विरघळणारा असल्याने तो शत्रूच्या पाणीसाठ्यात विरघळवून त्यांचा खात्मा करण्यासाठीही वापर केला जात होता.  स्थानिक मंडळी शिक्षा म्हणून अर्धशुद्धीमध्ये असलेल्या अपराध्यांना झाडाला बांधून ठेवायचे. अंगावर चीक पडल्याने, पाने घासल्याने या माणसाचा वेदनेने तडफडून मृत्यू व्हायचा.

आपली प्रतिक्रिया द्या