‘गो नियाझी गो बॅक’, कश्मीरच्या नागरिकांचे इमरान खान विरोधात नारे 

3747

केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याने बिथरलेला पाकिस्तान जगाचे लक्ष वेधण्यासठी नवीन नवीन क्लृप्त्या लढवत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी शुक्रवारी पाकव्याप्त कश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथे एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला संबोधित करताना इमरान खान यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या विरोधात भाष्य केलं आहे. तेथे उपस्थित लोकांना हिंदुस्थान विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मात्र त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. तेथील लोकांनी इमरान यांच्या विरोधातच ‘गो नियाझी गो’ च्या घोषणा दिल्या. पाकव्याप्त कश्मीरमधील एका मोठ्या जनसमुदायाला पाकिस्तानपासून वेगळं होण्याची इच्छा आहे. येथील लोक पाकिस्तानी सैनिकांच्या अत्याचाराने त्रस्त झाले आहेत.

इमरानच्या विरोधात घोषणाबाजी करणारा कश्मीरमधील लोकांचा हा व्हिडिओ पाकिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अझाकिया यांनी ट्वीट केला आहे. त्यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, ‘गो नियाझी गो’, ही तीच घोषणा आहे जी आजच्या रॅलीमध्ये कश्मिरी देत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तान आणि इमरान खान यांचा खूप अपमान होत आहे. हा नारा गेल्या आठवड्यातच पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध झाला. पाकिस्तानमध्ये इमरान खान सरकारला एक वर्ष पूर्ण झाल असता त्यानिमित्त पाकिस्तानच्या संसदेत संयुक्त अधिवेशन बोलावण्यात आले होते. त्यावेळी पाकिस्तानमधील विरोधीपक्षातील खासदारांनी संसदेत पंतप्रधान इमरान खान यांच्या विरोधात ‘गो नियाझी गो’ च्या घोषणा दिल्या होत्या.

इमरान यांचे पूर्ण नाव हे इमरान अहमद खान नियाझी आहे. ‘गो नियाझी गो’ म्हणण्यामागे एक मोठे कारण म्हणजे इमरानची तुलना जनरल नियाझीशी केली जाते. जनरल नियाझी यांच्या नेतृत्वात पाकिस्तान बांगलादेशात हिंदुस्थान विरोधात युद्ध लढला होता. या युद्धानंतर पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र बनले. 1971 च्या या युद्धात जनरल नियाझी यांनी सुमारे 92 हजार सैनिकांसह हिंदुस्थानासमोर आत्मसमर्पण केले होते. पाकिस्तानी लोक या घटनेला त्यांच्या इतिहासाचा एक काळा दिवस मानतात.

आपली प्रतिक्रिया द्या