देशविदेश-पोळी…भाकरी…रोटी…

<< शेफ मिलिंद सोवनी chefmilind@hotmail.com >>

रोजच्या जेवणातील पोळी, भाकरी थोड्या वेगळ्या स्वरूपात…

जेवण म्हटलं म्हणजे पोळी, भाकरी आलंच… या भाकरीचे अनेक प्रकार आपल्याकडे होतात. आपण तोच प्रकार वेगवेगळ्या नावांनी संबोधतो. म्हणजे पोळी, तंदूर रोटी, नान… हे पदार्थ कसे बनवायचे ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. म्हणूनच जरा वेगळा म्हणून मी येथे ओटमिलची रेसिपी दिली आहे. ओटमिल हल्ली खूपच हेल्दी समजलं जातं. नाश्त्यात दुधाबरोबर खाल्ले जाते. हे ओटमिल आणि गव्हाचा आटा हे मिक्स करून रोटी बनवली आहे. ही रोटी साधारणपणे कोणत्याही भाजीबरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर खाता येईल.

ओटमिलच्या या रोटीमध्ये हेल्दीपणा आणण्यासाठी कोथिंबीर, ऑलिव्ह ऑईल, कांदा, मीठ, ओवा वगैरे घातलंय. वेगळ्या प्रकारची रोटी म्हटलं की आपण त्यात बटाट्याची किंवा दुसरी एखादी भाजी घालून आलू पराठा बनवतो. पण ही रोटी नुसतीसुद्धा गरमगरम खाता येईल. त्याच्याबरोबर तोंडीलावणं काही नसलं तरीही चालू शकते. शिवाय ती हेल्दीही आहे. त्यात फायबरही आहे. ओटमिल पचनासाठी हलके असते. ब्रेड म्हटलं म्हणजे पाव… जगभरातही ब्रेडचा अर्थ असाच घेतला जातो ज्यात अंडे, यिस्ट किंवा दही वगैरे घातलेले असते.  पण आपली जशी चपाती असते, तशाच पद्धतीने पाश्चिमात्य देशांमधील लोक ब्रेड खातात. पण बहुतांश त्यांच्या या ब्रेडमध्ये काही आंबवलेले पदार्थ घातलेले असतात.

साऊथ अमेरिकन लोक म्हणजेच मेक्सिको, ब्राझिल, पेरू या देशांमधले लोक हिंदुस्थानी संस्कृतीच्या जवळपासचे आहेत. त्यांच्याकडेही आपल्यासारखी पोळी असते पण तेथे त्यांना ‘टॉटिया’ म्हणतात. मेक्सिकन घरांमध्ये टॉटिया बनवून ठेवलेले असतात. हे टॉटिया दोन पद्धतीने बनतात. स्पॅनिश पद्धतीत गव्हाच्या किंवा मैद्याच्या पिठाचे बनतात, पण मेक्सिको आणि साऊथ अमेरिकेत टॉटिया हे मक्याच्या पिठाने बनवले जातात. तेथे मका भरपूर पिकतो म्हणून असेल. तेथे हे बनवून ठेवले जातात. मग एखाद्या दिवशी एखाद्या खास पदार्थात बुडवून ते खातात. नाहीतर बहुतांश मेक्सिकन पद्धत अशी आहे की, त्या टॉटियामध्ये काहीतरी स्टफिंग घालून त्याचा रोल बनवला जातो. मटणाचा खिमा वगैरे… या रोल केलेल्या चपात्यांना तेथे वेगवेगळी नावं आहेत. टॉटियाची दुसरी खासियत म्हणजे ती कुरकुरीत करण्यासाठी ती वाळवतात. मग त्याचे छोटेछोटे त्रिकोण कापून ते तळले जातात आणि डब्यात भरून ठेवतात. त्यानंतर जेव्हा पाहिजे तेव्हा वेफर्ससारखे ते खातात. टॉटिया ही त्यांची एक प्रकारची पोळीच आहे. त्यांच्याकडे टॉटिया ही खास पोळी आवडीने खाल्ली जाते. ही अशी एकच पोळी आहे ज्यापासून जगात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.

टॉटियाची कॉन केर्न

साहित्य : मटण खिमा (शिजवलेला) ५०० ग्रॅम, टोमॅटो २ (साले काढून आणि कापून), लसूण १ पाकळी, लोणी ६० ग्रॅम, मीठ चवीपुरते, १० काळीमिऱया, १० एन्चिलाडाज, १ कांदा (बारीक चिरलेला), पनीर पाव कप, ओवा पाव चमचा, लेटय़ुस पाला कापलेला आणि टोमॅटोचे चार काप.

कृती : प्रथम गरम कढईत लोणी घालून त्यात टोमॅटोचे तुकडे आणि लसूण किमान ५ मिनिटे परतून घ्यायचे. मग गॅस मंद करून मिश्रणात मीठ आणि काळीमिरी घालून त्यात शिजवलेला मटण खिमा घालायचा. मिश्रण एकजीव करायचे. मग एका पॅनमध्ये लोणी घालून त्यात एन्चिलाडाज घालून दोन्ही बाजूंनी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे.  एन्चिलाडाजच्या मधोमध दीड चमचा मटण खिमा आणि टोमॅटोचे मिश्रण भरायचे. त्यात कापलेला कांदाही घालायचा. त्याचा रोल करून एका प्लेटमध्ये ठेवायचे.

ओटमिल-कांद्याची रोटी

साहित्य : ओटमिल २५० ग्रॅम, गव्हाचा आटा ५०० ग्रॅम, ओवा ५ ग्रॅम, मीठ १० ठॉम, कोथिंबीर ५ ग्रॅम, कापलेला कांदा ४० ग्रॅम ऑलिव्ह ऑईल १० मि.ली., हळद पावडर ३ ग्रॅम, पाणी ४०० मि.ली.

कृती : सर्वप्रथम सर्व साहित्य एकत्र करून त्याचा मध्यम आकाराचा गोळा बनवायचा. १० मिनिटे तो ओल्या फडक्याने झाकून ठेवायचा. या पिठाचे १७ एकसारखे बॉल्स बनवायचे. एकेक बॉल ७० ग्रॅम् होईल असे पाहायचे. प्रत्येक बॉल एकेका ब्रेडमध्ये गुंडाळून तंदुरमध्ये शिजवून घ्यायचा. हा प्रत्येक ब्रेड ६० ग्रॅमचा असावा.