महिलांना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर पोलिसांची कारवाई, 16 जणांवर गुन्हे दाखल

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच शहर परिसरातील नागरिकांना व महिला मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोंना कोतवाली पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. येथील वाडीयापार्क व परिसरात राहणाऱ्या महिला, फिरायला येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, व्यायामासाठी, फिटनेससाठी येणाऱ्या महिला, कोचिंग क्लासेससाठी येणाऱ्या मुलींना रोडरोमिओंकडून त्रास दिला जात होता. काही रोडरोमिओ हे जोरात मोटारसायकल चालविणे, मोठमोठ्याने हॉर्न वाजविणे, रस्त्यावर वाहने लावून वाढदिवसाचे केक कापणे, मुलींच्या अंगावर पाण्याच्या बाटल्या तसेच पाणी फेकणे तसेच वाडीयापार्क परिसरात दारु पिवून तेथेच बाटल्या फेकणे तसेच मुलींचे पालक त्यांना घेण्यासाठी आल्यानंतर त्यांचे अंगावर पाणी फेकने असे प्रकार करून त्यांना त्रास देत होते.

याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात प्राप्त तक्रारींचा आढावा घेऊन त्या अनुषंगाने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मागदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारांनी वाडीयापार्क येथील संपुर्ण परिसर, टिळकरोड, वाडीयापार्क मैदानाच्या बाहेरील दुकानाच्या रांगेसमोर गस्त घालत वेगात गाडी चालवणारी व गोंधळ घालत असणारी मुले ताब्यात घेतली. या परिसरातील विनाकारण फिरणाऱ्यांना कोतवाली पोलिसांकडून समज देण्यात आली असून गोंधळ घालणाऱ्या सोळा जणांवर मुंबई पोलीस कायदयाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईचा धसका अनेक रोडरोमिओंनी घेतला असून आता अशा टवाळखोरांवर वारंवार कारवाई करण्यात येणार असल्याने महिला मुलींनी समाधान व्यक्त केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, सतिष भांड, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, श्रीकांत खताडे, अतुल काजळे, अशोक कांबळे, सतीश भांड, अशोक सायकर आदींनी केली आहे.

तर महिला-मुलींनो अशी करा तक्रार!

अशा कारवाईची ही सुरुवात असून वाईट उद्देशाने महिला व मुलींच्या मागे फिरणे, स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, वारंवार फोन करणे, फेसबुक, व्हॉटसअप, इंस्टाग्रामवर वारंवार मेसेज करणे, प्रवासात वाईट उद्देशाने स्पर्श करणे, वेगवेगळे हातवारे करणे असा कोणत्याही प्रकारे त्रास दिल्यास कोतवाली पोलीस ठाण्याच्या 0249/2416117 या क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या 7777924603 या क्रमांकावर टेक्स मॅसेज अथवा व्हॉटसअप मेसेज करुन तक्रार करता येईल. या क्रमांकावर टेक्स मॅसेज अथवा व्हॉटसअप मेसेज करुन तक्रार करता येईल.