दुसऱ्या दिवशीही अश्विनीच्या मृतदेहाचा मागमूस नाही

17

सामना ऑनलाईन । भाईंदर

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी आज सलग दुसऱ्या दिवशी नौदल आणि पोलिसांनी वसईच्या खाडीत सर्च ऑपरेशन केले. सोमवारी पानबुड्य़ांच्या मदतीने खाडी ढवळून काढूनही मृतदेह हाती न लागल्याने आज भल्यामोठ्य़ा लोखंडाच्या हुकाने समुद्राचा तळ खरवडण्यात आला. मात्र हा प्रयत्नही फसला असून लोखंडी पेटीऐवजी या हुकाला रेती आणि दगडाने भरलेल्या दोन ते तीन गोण्या अडकल्या. त्यामुळे सुरुवातीला काहीतरी सापडेल या आशेवर असलेल्या तपासयंत्रणांची निराशा झाली, पण आरोपी महेश फळणीकर याने ठामपणे पुन्हा तोच ‘स्पॉट’ दाखवल्याने पोलीस आता नव्या पद्धतीने मृतदेहाचा शोध घेणार आहेत.

आमचा प्रयत्न सुरूच राहील

तपास यंत्रणा संपूर्ण ताकद लावून मृतदेहाचा शोध घेत आहे. सलग दुसऱ्या दिवशी आम्हाला यश आले नसले तरी आमचा प्रयत्न सुरूच राहील. मृतदेह शोधण्यासाठी आता वेगळ्या पद्धतीचा किंवा अन्य पर्यायी मार्गाची चाचपणी करू, अशी माहिती पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अभय कुरुंदकर याचा बालमित्र महेश फाळणीकर याने दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई पोलीस नौदलाच्या मदतीने गेल्या दोन दिवसांपासून वसईच्या खाडीत मृतदेहाचा शोध घेत आहेत. सोमवारी पानबुड्य़ांनी अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन करूनही मृतदेह असलेली लोखंडी पेटी सापडली नाही. त्यामुळे आज पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो यांच्या उपस्थितीत शोधकार्याला पुन्हा सुरुवात केली. मात्र सकाळच्या सत्रात काहीच हाती न लागल्याने दुपारनंतर लोखंडी हुकाने खाडीतील वाळू खरवडण्यात आली, पण या हुकाला लोखंडी पेटीऐवजी दोन ते तीन मोठ्य़ा गोणी अडकल्या. त्या बाहेर काढून त्यांची तपासणी केली असता आतमध्ये वाळू आणि दगड असल्याचे उघड झाले.

आपली प्रतिक्रिया द्या