वनविभाग आणि पोलिसांचे ‘ब्ल्यू मून ऑपरेशन’, लाखांचे सागवान जप्त

सामना प्रतिनिधी । किनवट

चंद्रग्रहण समाप्त होत असतानाच नांदेडच्या वनविभागाने आणि जिल्हा पोलीस दलाने मुलतान चिखली ता. किनवट या गावात वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून २८ ट्रॅक्टर सागवान जप्त केले. तसेच चिखली परिसरात असलेल्या सात ते आठ अवैध सॉ मिल्सवर धाडी टाकून त्याला सिल लावण्यात आले. ‘ब्ल्यू मून ऑपरेशन’ या नावाने ही कारवाई करताना किनवट आणि बोधडी येथील वन अधिकाऱ्यांना साधी कुणकुणही लागू दिली नाही.

गेल्या पंधरा दिवसापासून किनवट आणि माहूर तालुक्यात अवैधरित्या सागवानाची वृक्षतोड झाल्यामुळे तिघा जणांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नांदेड दौरा झाल्यानंतर या तालुक्यातील काही मंडळींनी किनवटचे ऐतिहासिक व नैसर्गिक जंगल उद्ध्वस्त होत असून, या वनराईच्या संरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्ते तसेच वनमित्रांनी केली होती. बोधडी ते किनवट या मार्गावर चिखली नावाचे गाव असून हे गाव मुलतान चिखली या नावाने ओळखले जाते. या गावात बाहेरचा कुठलाही माणूस आला तर त्याच्यावर पाळत ठेवली जाते. केवळ पंधराशे वस्तीचे गाव, मात्र या गावातील अनेकांचा गुजारा या लाकूड तोडीवर होतो. डोंगराळ भागात जेथे वाहन देखील जावू शकत नाही, तेथून जनावरांच्या साह्याने सागवानी लाकडाचे ओंडके डोंगरातून खाली टाकायचे आणि त्याची विक्री करायची असा अनेकांचा व्यवसाय. डोंगराळ भागातील सागवान झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्यामुळे या भागातील वनराई नष्ट होत आहे. वीस वर्षापूर्वी खांडेकर या अधिकाऱ्याने या गावात जाण्याची हिंमत केली होती आणि त्यावेळी देखील अशीच धडक कारवाई करण्यात आली होती.

काल रात्री चंद्रग्रहण संपत असतानाच नांदेड वनविभाग आणि नांदेड पोलीस दलाने संयुक्तपणे चिखली मुलतानी या गावाला घेरले. या गावातील महिला मोठ्या प्रमाणात समोर येण्याची कल्पना पोलिसांना असल्याने मोठ्या प्रमाणात महिला पोलीस कर्मचारी याठिकाणी तैनात करण्यात आले. रात्रीच ही नाकाबंदी करण्यात आल्यानंतर आज पहाटे सहा वाजल्यापासून जवळपास २८ ट्रॅक्टर व एक आयचर टेम्पो अशा २९ वाहनांतून जंगलातून कटसाईज करण्यात आलेले सागवानी लाकूड व रुपांतरीत केलेला माल वनविभागाने जप्त केला आहे. आज दुपारी बारा वाजता ही कारवाई पूर्ण करण्यात आली. सुरुवातीला गावातील महिलांनी व काही गावकऱ्यांनी या मोहिमेला तीव्र विरोध करुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा असल्याने गावकऱ्यांना देखील काही करता आले नाही. उपवनसंरक्षक आशिष ठाकरे आणि सहायक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

किनवट आणि बोधडी येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची साधी कुणकुणही लागू देण्यात आली नाही. चिखली या गावात बहुतांशी लोक मुलतानी मुस्लीम समाजाचे असून, त्यांचा या भागात मोठ्या प्रमाणात दरारा आहे. तेलंगणा आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सागवानाची तस्करी करणे हा त्यांचा उद्योग आहे. काही स्थानिक अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्यामुळे त्यांच्या या कारवाईला पाठबळ मिळत असते. मात्र आशिष ठाकरे व डॉ.राजेंद्र काळे यांनी अत्यंत पध्दतशीरपणे या गावाला घेरा घालून ही कारवाई यशस्वी केली. जप्त केलेल्या मालाची किंमत जवळपास ७५ लक्ष रुपये एवढी असली तरी पर्यावरणाचे झालेले नुकसान हे मोजता येणार नाही. पोलिसांनी व वनविभागाने सात अवैध सॉ मिलवर देखील कारवाई करुन तेथेही मोठ्या प्रमाणात सागवान जप्त केले आहे. महाराष्ट्रातील पोलीस व वनविभागाची ही पहिलीच संयुक्त कारवाई मानल्या जाते. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या पथकाने वनविभागाला मोठे सहकार्य केले.

आपली प्रतिक्रिया द्या