अभिनेत्री भाग्यश्रीच्या घरात डल्ला मारणारे ५ वर्षांनी गजाआड

सामना प्रतिनीधी । ठाणे

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या घरी गुंगीच्या औषधांचा वापर करून चोरी करणाऱ्या दोन फरार चोरट्यांच्या ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ६२ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

‘मैने प्यार किया’फेम अभिनेत्री भाग्यश्री यांच्या जुहू येथील घरात २४ जानेवारी २०१४ रोजी गुंगीचे औषध वापरून चोरी करण्यात आली होती. या घटनेत त्यांच्या सासू-सासऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. काही दिवसात याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र पिंटू निषाद (२६), त्रिवेणी निषाद (३३) या दोन फरार आरोपींना युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने पोखरण रोड येथील वसंत विहार परिसरातून अटक केली. यावेळी त्यांच्याकडे सापडलेल्या काळ्या सॅकमध्ये लोखंडी कटावणी व स्क्रू ड्रायव्हर आढळून आले. हे दोघेही दरोड्याच्या तयारीत होते. सधन कुटुंबात नोकर म्हणून कामाला राहून त्यांच्या घरात चोरी करण्याची कार्यपद्धती चोरटे वापरत होते. त्यातूनच अभिनेत्री भाग्यश्री यांच्या घरात चोरी केल्याचे त्यांनी पोलीस चौकशीत कबूल केले.

आपली प्रतिक्रिया द्या